ऑनलाईनलाच्या कामाला प्राथमिक शिक्षकांचा विरोध

0

शिक्षणाधिकारी काटमोरे यांना दिले निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी) –  कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसताना शिक्षकांना ऑनलाईन प्रकारची कामे देण्यात येत आहे. ऑनलाईन कामे करतांना शिक्षकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. अशा प्रकारच्या कामांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळत चालल्याचा आरोप करत जिल्हा प्राथमिक व माध्यमिक शिक्षक समन्वय समितीने ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्याच्या डिजीटल युगात संगणकीय कामांना शिक्षकांचा विरोध नाही. मात्र या कामात शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ व पैसा वाया जातो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो. दुहेरी कात्रीत सापडलेल्या शिक्षकांची यात मोठी कुचंबना होते. सरल पोर्टल अपडेट करतांना शिक्षकांना रात्र रात्र जागावे लागते. त्यामुळे शिक्षकांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ बिघडले आहे.
य कामासाठी शासनाने कुठलीही आर्थिक तरतूद केलेली नाही. तसेच ही कामे सायबर कॅफेत करु नयेत अशाही सुचना आहेत. सुविधा उभ्या केल्या तर सगळीकडे नेटवर्क नाही. अशा अनेक प्रकारच्या अडचणी शिक्षकांसमोर आहेत. त्यामुळे ऑनलाईनची कामे आम्ही करणार नाहीत.
रात्री उशिरा अधिकारी शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट टाकुन माहिती मागवितात. अनेक अडचणी असतांनाही तातडीने अहवाल, माहिती मागविण्यात येते. त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक हे तणावाखाली वावरत अस्लयाचे दिसते. त्यामुळे यापुढे लेखी अथवा तोंडी आदेश देण्यात यावेत. त्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ देण्यात यावा.
राज्यात डिजीटल शाळांची चर्चा सुरु असतांना जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांची वीज बील थकल्याने तोडण्यात आलेली आहे. सरकारी शाळांना व्यावसायिक दराने वीज खरेदी करावी लागते. सरकारी शाळांकडे या खर्चासाठी तरतूद नाही.
त्यामुळे शाळांना घरगुती दराने वीज पुरविण्यात यावी. नवीन शाळा बांधकामांची जबाबदारी ही बांधकाम विभागावर सोपवावी. मुख्याध्यापक, शिक्षकांवार नको.
यावेळी शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर, बापूसाहेब तांबे, भाऊसाहेब चासस्कर, संजय शेळके, संजय व्यवहारे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*