Friday, April 26, 2024
Homeनगरअण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची ऑनलाईन सेवा बंद

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची ऑनलाईन सेवा बंद

राहुरी (प्रतिनिधी) – गेल्या एक महिन्यापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील लाभार्थी तरुणांना बँक प्रकरणासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.
महामंडळाच्या पोर्टलवर संबंधित लाभधारकास आपली वैयक्तिक माहिती देऊन महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढावे लागते. त्या पत्रासोबत बँकेला देण्यासाठीचे शासनाचे हमीपत्र देखील मिळत होते. परंतु महामंडळाची ऑनलाईन सेवा बंद झाल्यामुळे या योजनेचा लाभ तरुणांना मिळण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, सरकार बदलल्यामुळे ही योजना बंद झाली की काय? अशी शंका मराठा समाजातील तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची योजना लवकर चालू करावी, अशी मागणी मराठा समाजातील व्यवसायिक तरुणांकडून करण्यात येत आहे.
मराठा समाजातील होतकरू तरूणांना व्यवसाय वाढीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून बिगरव्याजी कर्जपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभधारकाला बँकेकडून विनातारण व विना जामीनदार अशी तरतूद करण्यात आली आहे. कर्जाची संपूर्ण हमी शासनाने घेतलेली आहे.

- Advertisement -

योजना सुरू झाल्यानंतर महामंडळाच्या योजना राबविण्यास बँका टाळाटाळ करत होत्या. बँका महामंडळ योजनेअंतर्गत कर्जप्रकरणे देण्यास टाळाटाळ करतात म्हणून मराठा संघटनांच्या वतीने मध्यंतरी आंदोलने देखील करण्यात आली होती. सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्याची दखल घेत महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व बँक अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यानंतर बँक कर्ज देण्यास अनुकूल झाल्या होत्या. मात्र, आता ऑनलाईन सेवा बंद झाल्याने मराठा समाजातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा महामंडळाची ऑनलाईन सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी मराठा तरुणांकडून करण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद
अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना ही बंद करण्यात आलेली नाही. महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ऑनलाईन पोर्टलवर काही तांत्रिक दुरूस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच ऑनलाईन नावनोंदणी सुरू होणार आहे. ज्या लाभधारकांना योजने अंतर्गत कर्ज मिळाले आहे, त्यांची महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टेलवर पुढील दस्तावेज नोंदणी चालू आहे.
देवेंद्र लांबे,
समन्वयक-मराठा एकीकरण समिती

- Advertisment -

ताज्या बातम्या