सायबर पोलिसांमुळे ऑनलाइन लूट टळली

१ लाखाची रक्कम थांबवण्यात यश

0
नाशिक | दि. २७ प्रतिनिधी- बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्डची माहिती घेऊन वृद्धेच्या खात्यातील रक्कम ऑनलाईन हडप करण्याचा प्रयत्न नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्याच्या तत्परतेने फसला आहे. दीड लाखाच्या रकमेपैकी १ लाख ८ हजाराची रक्कम वाचविण्यात पोलिसांना यश आले असून शहरात प्रथमच असे घडल्याचे सूत्रांनी सांगीतले.

मुंबई येथील स्टेट बँकेतून बोलत असल्याची बतावणी करीत देवळाली कॅम्प येथील वृध्द महिलेच्या डेबिट कार्डची माहिती मिळवित भामट्यांनी बँक खात्यातून १ लाख ४८ हजार २९३ रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर महिलेने लगेच केलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तातडीने संबधित बँकांशी सपर्क साधल्याने या महिलेस खात्यातून वर्ग झालेल्या रकमेपैकी १ लाख ८ हजार रुपये परत मिळणार आहेत. सायबर पोलिसांच्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
या प्रकरणी गीता रविंदरकुमार अधिकारी (६८ रा.धोंडीरोड, दे.कॅम्प ) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार १७ मे रोजी अधिकारी यांना मुंबईच्या स्टेट बँकेतून जनरल मॅनेजर बोलत असल्याचे सांगून दपिक शर्मा नाव सांगणार्‍या ठगाने त्यांच्या बँक डेबिट कार्डची माहिती घेतली आणि इंटरनेटच्या माध्यमातून १ लाख ४८ हजार २९३ या महिलेच्या खात्यातून परस्पर काढून घेतले.

या महिलेच्या मुलीने एनआरआय व्हिसा कार्डसाठी अर्ज केला असून त्यासाठी गॅरेंटी म्हणून तुमच्या डेबिट कार्डची माहिती लागणार असल्याचे सांगून ही फसवणूक करण्यात आली. मात्र या महिलेची तक्रार प्राप्त होताच सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पवार यांनी संबधित महिलेच्या वॉलेटशी संबधीत नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधून सदर व्यवहार रद्द करण्याचे कळविले.

यावेळी फसवणूक करणार्‍या आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून पोलीस त्याच्या तपासासाठी रवाना झाले आहेत. फसवल्या गेलेल्या रकमेपैकी १ लाख ८ हजार रूपये आरोपीने अद्याप विड्रोल केलेले नाही त्यामुळे ही रक्कम परत मिळणार आहे.

बँक खात्याची माहिती दूरध्वनीवर देऊ नका
कोणतीही बँक दूरध्वनीद्वारे क्रेडिट व डेबिट कार्डची संबंधित माहिती विचारत नाही. काही माहिती हवी असल्यास आपणास बँकेत बोलवले जाते. यामुळे असे फोन नागरिकांनी टाळावे. कुठलीही माहिती संबंधितांना देऊ नये अन्यथा आपली ऑनलाईन फसवणूक अटळ आहे.
– अनिल पवार, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

LEAVE A REPLY

*