Friday, April 26, 2024
Homeनगरऑनलाईन फास्ट टॅगचा बोेजवारा

ऑनलाईन फास्ट टॅगचा बोेजवारा

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाच रांगा

संगमनेर (तालुका प्रतिनिधी) –राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्यातील सर्वच महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्ट टॅगची सुविधा रविवार दि. 15 डिसेंबरपासून सुरू केली. मात्र, संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर सकाळपासूनच नेटवर्क कमी असल्याने फास्ट टॅगच्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी चांगलेच संतप्त झाले होते. टोलनाक्याचे कर्मचारी व वाहनचालकांमध्ये जोरदार भांडणे झाल्याचे पहावयास मिळाले.

- Advertisement -

शनिवार दि. 14 डिसेंबर मध्यरात्रीपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेली फास्ट टॅगची सुविधा खडतर असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले. दि. 1 डिसेंबर रोजी सुरू होणारी फास्ट टॅग सुविधा 15 डिसेंबरपर्यंत स्थगित केली होती. ती कालपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, परिस्थिती खूपच वेगळी होती. फास्ट टॅगमधून जाणार्‍या प्रत्येक वाहनावर फास्ट टॅगची चिप असूनसुद्धा केवळ नेटवर्कच्या अडचणीमुळे एका गाडीला पाच मिनिटे लागत होते. त्यामुळे लहान-मोठ्या वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटर अंतर लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे फास्ट टॅग असूनही प्रत्येक वाहनांकडून टोल घेतला जात होता.

पुण्याकडून नाशिकसाठी आणि नाशिककडून पुण्याकडे जाणार्‍या ज्या वाहनचालकांनी अद्याप फास्ट टॅग काढले नाही. त्यांचेही हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अतोनात हाल होताना दिसत आहेत. टोलनाका प्रशासनाकडून दोन्ही बाजूने फास्ट टॅगची सुविधा नसलेल्या दोन-दोन लेन सुरू असल्याने प्रवाशांसह वाहनचालकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या वाहनांच्या रांगा कमी होत नव्हत्या. टोल कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये भांडणेही होत आहे. फास्ट टॅग काढूनही आम्हाला किमान अर्धा तास उशीर होत आहे. त्यामुळे फास्ट टॅगचा उपयोग काय, असेही यावेळी प्रवासी व वाहनचालक म्हणत होते.

स्थानिकांचे काय?
फास्ट टॅग सुरु झाले. मात्र स्थानिकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांना या टोलनाक्यावर टोल फ्री आहे. मात्र टोल प्रशासनाकडून फास्ट टॅग नंतर कुठलीही पर्यायी व्यवस्था केली गेलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरीक व टोल कर्मचार्‍यांमध्ये वाद होण्याची चिन्हे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या