ऑनलाईन फसवणूक करणारा नायजेरियन तरुण अटकेत

0
नाशिक । लग्नाचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुकीद्वारे महिलेस 1 लाख 67 हजार 500 रुपयांचा गंडा घालणार्‍या नायजेरियन संशयित तरुणाला नाशिक ग्रामीण पोलिसांनी सोमवारी अटक केली.

पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिसांनी दिल्लीतील ग्रेटर नोएडा परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

किंग्सले चिबुकेम असे या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणातील फिर्यांदीने लग्नासाठी ‘जीवन साथी डॉट कॉम’वर प्रोफाईल अपलोड केले होते. या अनुषंगाने आरोपीने फिर्यादीस लग्नासाठी रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात ऑनलाईन चॅटिंग होवून संपर्क वाढला होता. यातून आरोपीने फिर्यादीस क्युरीअरद्वारे भेट वस्तू पाठवली असून ती सोडवून घेण्याची विनंती केली.

संशयित आरोपीने फिर्यादीस विश्वासात घेवून आपला अकाऊंट नंबर दिला व त्यावर पैसे पाठवण्यास सािंंगतले. यानुसार फिर्यादीने 1 लाख 67 हजार 500 रुपये या अकाऊंटवर जमा केल्यानंतर फिर्यादीस आपली फसवणूक झाली असल्याचे  लक्षात आले. संशयित आरोपी किंग्सले चिबुकेम हा नायजेरियन तरुण काही वर्षांपासून विद्यार्थी व्हिसाच्या आधारे दिल्लीच्या ग्रेटर नोएडा भागातील डेल्टा 2 या ठिकाणी तो राहत होता.

किंग्सलेने काही दिवसांपूर्वी मिचेल ससोन क्रग या बनावट नावाने ओझर येथील महिलेशी ‘जीवन साथी डॉट कॉम’ साईटद्वारे संपर्क केला.

आपण लंडनमधील एका अन्नपदार्थ उत्पादक कंपनीत सेवेत असल्याचे त्याने भासवले. ओझर येथील पीडित महिला पतीशी मतभेद असल्याने आर्ई-वडिलांकडे राहते. ब्युटीपार्लर चालवून उदरनिर्वाह करणार्‍या या महिलेने एका ‘जीवन साथी डॉट कॉम’ वेबसाईटवर आपली माहिती व फोटो अपलोड केले होते. वेबसाईटवरून ओळख झाल्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरही संवाद सुरू झाला.

मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यानंतर संशयिताने पीडित महिलेला भेटण्यासाठी येत असल्याची बतावणी केली, तसेच तुझ्या पत्त्यावर काही भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. साधारणतः दोन दिवसांनी दिल्लीतून डेल्टा कुरिअर सर्व्हिसमधून श्वेता नावाच्या मुलीचा फोन आला. तिने पार्सल सोडवण्यासाठी 42,500 रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. त्यानुसार पीडित महिलेने पैसे जमा केले.

यानंतर भेटवस्तू महाग आणि मोठी असल्याने विमानतळावर कस्टम ड्युटी म्हणून एक लाख 25 हजार रुपये भरण्यास संशयिताने महिलेला तयार केले. यानंतर पुन्हा 70 हजार 500 रुपयांची मागणी झाल्यानंतर महिलेचा संशय बळावला. तिने ओझर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही घटनेची गंभीर दखल घेत एक पथक दिल्लीला रवाना केले. मोबाईल फोन कॉल्सचे लोकेशन व इतर काही माहितीवरून संशयितास जेरबंद करण्यात आले.

सतर्कता बाळगावीऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: सुरक्षित मंडळीच यात फसवली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नुकत्याच घडलेल्या या प्रकरणाची पोलीस सखोल चौकशी करणार असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. – संजय दराडे, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

LEAVE A REPLY

*