ऑनलाईन सातबारा वाटप ठप्प; जिल्हा स्तरावर सर्व्हरसाठी चाचपणी सुरू

0
नाशिक । गत सहा दिवसांपासून सातबारा उपलब्ध होणारी महा-भूमिलेख तसेच तलाठ्यांचे काम सुरू असलेल्या फोर्टिक्लाईंट हे संकेतस्थळही ठप्प असल्याने शेतकर्‍यांना सातबाराच मिळत नाही. त्यामुळे बँकेत कर्जासाठीचा बोजा चढवण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जाणार्‍या शेतकर्‍यांची आता मोठी अडचण झाली असून जिल्हा स्तरावर सर्व्हर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी चाचपणी सुरू केली आहे.

पेपरलेस आणि पारदर्शक कामासाठी ऑनलाईनला प्राधान्य देणार्‍या शासनाकडून आता कुठल्याही सुविधा दिल्या जात नाहीत. आता तर शेतकर्‍यांना दिले जाणारे सातबारा उताराही मिळेनासे झाले आहेत. विशेष म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत द्राक्ष निर्यातीच्या नोंदणीची असलेली मुदतही संपल्याने आता निर्यातीचे काय, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

जरी विलंब शुल्क भरून नोंदणी करण्याची मुदत अजून काही दिवस असली तरीही हे विलंब शुल्क शेतकर्‍यांनी का भरावे, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय हस्तलिखित सातबाराही या बाबींसाठी ग्राह्य धरला जात नसल्याने द्राक्ष निर्यातदार शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली आहे.

परंतु संपूर्ण जिल्ह्यातील हे सर्व्हर ठप्प असल्याची शासनाच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागास काहीही घेणे-देणे नसल्याचेच यातून स्पष्ट झाले आहे. संपूर्ण ऑनलाईनची आणि सर्व्हरची व्यवस्थाच त्यांच्या ताब्यात घेतल्याने आता जिल्हा स्तरावर कुठलीही व्यवस्था त्यांच्याकडून उपलब्ध केली जात नसल्याने जिल्हा स्तरावरील यंत्रणाही हतबल झाली आहे. परिणामी स्थानिक स्तरावर शेतकर्‍यांचे अजिबातच समाधान करता येत नसल्याने महसूल यंत्रणाही त्रस्त झाली आहे.

नोंदणी मुदत वाढवणार : आता ऑनलाईन सातबारामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. परंतु द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणीची मुदत संपली असली तरी त्यात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी कृषी विभागाशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर आता स्थानिक स्तरावर सर्व्हर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

*