Friday, May 3, 2024
Homeनगरकांदा बियाणे विक्री यंदाही ऑनलाईन

कांदा बियाणे विक्री यंदाही ऑनलाईन

राहुरी | Rahuri

करोना विषाणू संसर्गाचा मागील वर्षी उद्रेक झाल्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कांदा बियाणाची विक्री कशी करावी, असा प्रश्न विद्यापीठाच्या अधिकारी वर्गाला पडला होता. त्यामुळे ऑनलाईन स्वरुपात झालेली विक्री यंदाही कायम ठेवण्याचा निर्णय या कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी घेतला आहे. ही ऑनलाईन बुकिंग 14 जून 2021 सकाळी 11 वाजेनंतर सुरू होणार आहे.

- Advertisement -

मागील वर्षी पोर्टलवर नोंदणी करून नंतर बँकेच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून नोंदणी पूर्ण केली गेली. परंतु या वर्षी अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन कंपन्यांच्या नोंदणीप्रमाणेच फुले ग्रो मार्ट पोर्टलवर नोंदणी करून लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड याद्वारे पैसे भरून नोंदणी पूर्ण करता येईल, अशी माहिती बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके यांनी दिली.

यासाठी https://www.phuleagromart.org या वेबसाईटवर 11 जूनपासून ते बियाणे संपेपर्यंत कांदा बियाणे खरेदीची नोंदणी शेतकर्‍यांना करता येणार आहे. प्रति आधारकार्ड, सातबारा उतारा दोन किलो बियाणे या प्रमाणात फुले समर्थ आणि बसवंत 780 या बियाणाची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी बियाणाचा दर प्रति किलो रुपये 2 हजार असा असणार आहे. नोंदणी पद्धत अत्यंत सोपी असून आधारकार्ड आणि सातबारा उतारा https://www.phuleagromart.org या पोर्टलवर अपलोड करून नोंदणी करता येणार आहे.

नोंदणी पूर्ण होताच लगेचच इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड यांचे सहाय्याने पेमेंट करून खरेदीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी जोपर्यंत पोर्टलवर बियाणांची उपलब्धता दिसते तोपर्यंतच बियाणे नोंदणी करावी. पोर्टलवरील बियाणे उपलब्धता संपताच पुढे नवीन नोंदणी व्यवस्थेमध्ये होणार नाही, याची नोंद शेतकर्‍यांनी घ्यावी असे आवाहन डॉ.सोळंके यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या