नगरमध्ये कांदा व्यापार्‍याकडे एक कोटीच्या जुन्या नोटा सापडल्या!

0

संजय शेलार चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर (प्रतिनिधी)- नोटाबंदीला चार महिने उलटून गेल्यानंतरही जुन्या नोटा जप्त होण्याचे प्रकार सुरूच आहेत. अहमदनगर शहरातील श्रीरामचौक येथे राहणार्‍या संजय नामदेव शेलार या कांदा व्यापार्‍याकडून सुमारे 1 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई रविवारी (दि.21) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. शेलार हे नगर तालुक्यात येणार्‍या काही विदेशी पर्यटकांशी बंद चलनी नोटांचा व्यवहार करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी शेलार यांना रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कांदा व्यापारी संजय नामदेव शेलार (रा. राळेगण म्हसोबा, ता, नगर. हल्ली रा. नामदेव बंगला,सावेडी) यांच्या बंगल्यात लाखो रुपये असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. शेलार यांना जाळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनी दोन दिवस सापळा लावला होता. मात्र योग्य वेळ न साधल्यामुळे त्यांनी रविवारी सकाळी 7 वाजता या परिसरात सापळा रचला. नियमीत वेळेनुसार सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेलार ही पैशाची बॅग घेऊन बाहेर पडले. मात्र समोेर पोलिसांचा ताफा पाहुन तो घरात पळाले.
पोलिसांनी सावध भूमीका घेत त्याच्या पाठोपाठ प्रवेश करुन बेडच्या बाजुला ठेवलेली बॅग ताब्यात घेतली. ती उचकून पाहिली असता त्यात चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी सर्व घराची झडती घेतली, मात्र अन्य रक्कम मिळून आली नाही. घरात पैसे मोजण्याचे मशिन मिळून आले. ही रक्कम कोठून आली अशी विचारणा केली असता शेलार याने सांगितले की; मुलीच्या लग्नासाठी ही रक्कम ठेवली होती.
मात्र ती बँकेत जमा करण्याचे राहुन गेले. मात्र इतकी मोठी रक्कम बँकेत भरायची राहुन कशी जाते असा पेच पोलिसांना पडला आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी मुलीचा विवाह झाला आहे. तरी देखील ही रक्कम सफेद केली नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला. प्रथमिक माहितीनुसार शेलार हे परदेशी पर्यटकांच्या तसेच नगर तालुक्यात वेगवेगळ्या विदेशी व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. विदेशी लोकांना जुन्य नोट्या बदलून घेण्याची सुविधा सारकारने दिली आहे. त्याचाच फायदा घेऊन हा कळा पैसे सफेद करण्याचा प्रयत्न केला जात असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर या व्यपार्‍यावर कारवाई करण्यासाठी पुणे शाखेतील आयकर विभागाचे अधिकारी राऊत यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला आहे. आज पुण्याचे पथक तोफखाना पोलीस ठाण्यात येणार आहे. रकमेतील एक हजारांच्या नोटा असणारे 60 लाख 26 हजार व पाचशे रूपये असणारे 39 लाख 72 हजार 500 असे 99 लाख 98 हजार 500 रुपये ताब्यात घेणार आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधिक्षक घनश्यम पाटील, सहायक पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण वाखारे दिलीप पवार, देशमाने, कृष्णा वाघमारे, विश्‍वास गाजरे, संजय चोरडीया, सुद्रीक, जगताप, दीपक राहकले, भास्कर गायकवाड, पिनू गायकवाड, सोनवणे, गवांदे, हारुन शेख यांनी केली.
शेलारला समन्स
शेलार याला एक कोटी रुपयांसह ताब्यात घेण्यात आले होते. अद्याप या रकमेचा उलगडा झालेला नाही. हे पैसे कोठून आले, का ठेवले, किती लोकांची भागिदारी आहे. अशा अनेक गोष्टींचा तपास बाकी आहे. हा तपास करण्याचा अधिकारी आयकर विभागाकडे आहे. त्यामुळे शेलारला तात्पुरते समन्स पत्र देण्यात आले असून तपासाच्या वेळी वेळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यटकांच्या माध्यमातून सफेद पैसा
सरकाराने 1000 व 500 रुपयांच्या नोटा चलनातुन बंद केल्या आहेत. बँक, पोष्ट, पेट्रोलपंप, अत्यावश्यक सेवा या ठिकाणी देखील आता त्या चालत नाही. मात्र विदेशी नागरिकांकडून त्या स्विकारल्या जातात. नगर जिल्हा ऐतिहासिक असल्यामुळे येथे विदेशी पर्यटक येतात. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा सफेद केला जात असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे शेलार अशा पद्धतीने व्यापार करीत होता का याची पोलीस व शासनाने याची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*