नगर बाजार समितीत कांद्याचा वांदा!

0

भाव कोसळल्याने शेतकर्‍यांकडून लिलाव बंद रास्ता रोकोमुळे बायपास जाम 

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर बाजार समितीत शनिवारी झालेल्या कांद्याच्या लिलावात भाव तीन हजार 500 रुपये प्रती क्विंटल वरून थेट दोन हजार 500 रुपये क्विंटल असा कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडून बायपास वर ठिय्या मांडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान पोलीस बंदोबस्तातनंतर फेरलिलाव करण्यात आले.
अन्य राज्यांत कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली. यामुळे गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या भावाने उसळी मारत थेट तीन हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत मजल मारली. यामुळे शनिवारी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात जवळपास 300 ते 350 ट्रक कांद्याची आवक झाली. भाव वाढत असल्याने शेतकर्‍यांनी बाजारात विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात कांदा आणला. मात्र, काल सकाळी कांद्याचे लिलाव सुरु होताच भाव दोन हजार 500 रुपये प्रती क्विंटल पर्यंत खाली आल्याने शेतकरी चिडले. भाव तीन हजार 500 रुपये असताना लिलाव इतके कमी का अशी विचारणा करत शेतकर्‍यांनी लिलाव बंद करून बाह्यवळण रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोको केला.

जवळपास दोन ते तीन तास शेतकरी रस्त्यावर बसून संताप व्यक्त करत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवणनाथ चोभे, सचिव अभय भिसे व इतर संचालकांनी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलीस बंदोबस्त आल्यानंतर शेतकरी रस्त्यावरून उठले. पुन्हा लिलाव सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यांनतर शेतकर्‍यांनी तो हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तात नंतर लिलाव सुरू करण्यात आले.

विघ्नसंतोषींकडून चुकीची माहिती – 
नगर बाजार समितीत मध्यम प्रतीच्या कांद्याला दोन हजार 800 रुपये तर चांगल्या प्रतीच्या कांद्याला तीन हजार 500 रुपये भाव होता. शनिवारी जवळपास मध्यम कांदा बाजारात आल्याने त्याचे लिलाव दोन हजार 500 पासून सरू झाले. मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी शेतकर्‍यांना चुकीची माहिती देऊन लिलाव बंद करण्याचा प्रयत्न केला.
– अभय भिसे (सचिव नगर बाजार समिती)

LEAVE A REPLY

*