कांदा निर्यात शुल्कवाढ अटळ?; जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन

0
मनमाड । एकीकडे गेल्या काही दिवसापासून कांदा दरात थोडी वाढ झाल्यामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळालेला असताना, दुसरीकडे मात्र कांदा महाग झाल्याची सर्व थरातून ओरड सुरु झाली आहे. याची दखल घेत जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार परदेशातून कांदा आयात करण्याबरोबरच देशातून विदेशात केल्या जाणारी कांद्याची निर्यात कमी व्हावी यासाठी निर्यात शुल्कात वाढ करण्याचा विचार करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

जर परदेशातून कांदा आयात करण्यात आला आणि कांद्याच्या निर्यात शुल्कात वाढ करण्यात आली तर कांद्याच्या दरात पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली. सध्या कांद्याला जो भाव मिळत आहे ती दरवाढ नसून कांद्याला योग्य भाव मिळत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

कांद्याच्या दरात झालेली ही दरवाढ काही काळासाठी राहणार असून सप्टेंबरमध्ये नवीन कांदा बाजारपेठेत आल्यानंतर पुन्हा भाव कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विदेशातून कांदा आयात करू नये तसेच निर्यात शुल्कातही वाढ करू नये अशी बळीराजाची मागणी आहे. गेल्या दोन वर्षापासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे.

सात महिन्यापूर्वी तर काही बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतीक्विंटल किमान 50 रुपये अर्थात 50 पैसे किलो भाव मिळाला होता. एक किलो कांदा पिकवण्यासाठी शेतकर्‍याला किमान 8 ते 10 रुपये खर्च येतो. मात्र त्याच कांद्याला 50 पैसे किलो भाव मिळत होता. कष्टाने पिकवलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून त्यावेळी काही शेतकर्‍यांनी कांदा उकिरड्यावर फेकून दिला होता.

गेल्या काही दिवसापासून भावात वाढ होऊन कांद्याला सरासरी 2300 ते 2500 रुपये पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तब्बल दोन वर्षानंतर कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहून शेतकरी काहीसा सुखावलेला असतानाच कांद्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड सुरु झाली. विशेषत: दिल्ली, मुंबई सारख्या मेट्रोजमधील नागरिकांनी ओरड केल्यानंतर केंद्र सरकार विदेशातून कांदा आयात करण्याबरोबरच येथून विदेशात पाठवण्यात येत असलेल्या कांद्याच्या निर्यात शुल्कातही वाढ करण्याचा विचार करीत असल्याचे वृत्त समजताच शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

इतर वस्तूंचेही भाव वाढले : आता काही दिवसांपासून कांद्याच्या भावात किंचित वाढ झालेली असताना सर्वच जण त्याबाबत ओरडू लागले आहे.फक्त कांद्याचेच भाव वाढलेले आहे का? इतर जीवनावश्यक वस्तू देखील महाग झालेल्या असताना त्याबाबत कोणीही बोलत नाही.जर कांदा परवडत नसेल तर खाऊ नका?
– बाळासाहेब मिसर

अन्यथा भाव कोसळतील : परदेशातून कांदा आयात केला गेला आणि कांद्यावरील निर्यात शुल्कात वाढ केली गेली तर कांद्याचे भाव कोसळतील आणि त्याचा परिणाम शेतकर्‍यावर होऊन तो रस्त्यावर उतरण्याची दाट शक्यात आहे.सध्या कांद्याच्या भावात झालेली वाढ ही काही दिवसा पुरतीच असून सप्टेंबर महिन्यात नवीन कांदा बाजार पपेठेत आल्यानंतर भाव कमी होतील त्यामुळे शासनाने विदेशातून कांद्याची आयात करणाच्या विचार करू नये.
डॉ.संजय सांगळे,सभापती,मनमाड बाजार समिती

LEAVE A REPLY

*