Thursday, May 2, 2024
Homeनगरकांद्याचे व कापसाचे भाव गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात

कांद्याचे व कापसाचे भाव गडगडल्याने शेतकरी दुहेरी संकटात

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

आठ ते नऊ महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला कांदा निच्चांकी भावाने गडगडल्याने व कांद्याची अशी अवस्था असतांना कापसाचे देखील दर पडल्याने बळीराजा दुहेरी आर्थिक संकटात सापडल्याने संकटाची साडेसाती त्याची पाठ सोडायला तयार नाही.

- Advertisement -

राहुरी तालुका म्हणजे मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणाळचे पाणी असलेला सुजलाम सुफलाम तालुका. मुबलक पाटपाणी असल्याने हा उसाचा पट्टा आहे. परंतु गेल्या दहा वर्षांत उसाच्या दरात वाढ न झाल्याने व ऊस तोडीसाठी झालेली हेळसांड बघून बळीराजा कांदा, कपाशी व सोयाबीन या पिकाकडे वळला. दुर्दैवाने इथं देखील त्याची पाठ सोडली नाही. चार महिन्यांचे व कमी पाण्याचे पीक म्हणून मोठ्यासंख्येने शेतकरी या पिकाकडे वळले. साधारणपणे तीन साडे तीन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.

तरी देखील खर्चाच्या तुलनेत बरे पैसे होतात अशी शेतकर्‍यांची धारणा आहे. महागाई आकाशाला भिडल्याने इंधनासह शेतीसाठी लागणार्‍या सर्वच वस्तूंचे दर वाढले. यामध्ये मजुरीसह रासायनिक खते, किटकनाशके यांचा समावेश आहे. फक्त शेतमालामध्ये दरवाढ झाली नाही. दहा वर्षांपूर्वी एक एकर कांद्यासाठी पंधरा ते विस हजार रुपये खर्च येत होता. त्यावेळी युरियाची एक गोणी शंभर रुपयांना होती. आता कांदा लागवडीची मजुरीच अकरा ते बारा हजार रुपये झाली आहे. काढणीचाही हाच दर आहे. या सर्व महागाईमुळे कांदा भुसार्‍यात साठवणूक करेपर्यंत एकरी एक लाखाच्या वर खर्च जात आहे.

यामध्ये पाण्याचा व स्वतः शेतकर्‍यांच्या मेहनतीचा खर्च धरलेला नाही. त्यामुळे लाख सव्वा लाख खर्च झालेल्या कांद्याला तीन साडे तीन हजार भावाची रास्त अपेक्षा शेतकर्‍यांची आहे. पण यंदा झाले मात्र वेगळेच. सुरुवातीला कांदा बाराशे ते पंधराशे रुपये क्विंटल भावाने विकत होता.त्यावेळी काढणी सुरू होती. पुढे नक्कीच भाव वाढतील, या आशेने कांदा साठवून ठेवला. अपेक्षेप्रमाणे दर हळूहळू वाढू लागले. नोव्हेंबरपर्यंत कांदा तीन साडे तीन हजारावर गेला. परंतु त्यानंतर अचानक कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली. आठ महिन्या पुर्वी ज्या भावात कांदा विकत होता, त्या भावात आज कांदा विकत आहे.

म्हणजे मागील वर्षी साधारणपणे एप्रिल, मे मध्ये जो भाव कांद्याला होता.तो भाव आज डिसेंबरमध्ये आहे. जादा भावाच्या अपेक्षेने चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडल्याने मातीमोल भावात विकावा लागला तर अनेक शेतकर्‍यांनी सडलेला कांदा शेतात टाकून भुसारे मोकळे केले. यामुळे झालेला खर्च तर निघालाच नाही वरून खिशातून पैसे घालावे लागल्याने यंदा कांदा पीक शेतकर्‍यांसाठी मोठा जुगार ठरला आहे. ज्या पिकांवर मुला, मुलींच्या लग्नाची तयारी केली होती.त्याच पिकाने अंगठा दाखवल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

मोठ्या नैसर्गिक संकटातून वाचविलेला कांदा शेवटी भाव कोसळल्याने चाळीतच सडला आहे. यासर्व परिस्थितीला सरकारचे शेतकर्‍यांविषयी असलेले उदासिन धोरण कारणीभूत आहे.मताच्या राजकारणासाठी कांद्याची निर्यात थांबविल्याने शेतकर्‍यांवर आज ही वेळ आली आहे. वेळीच जर निर्यात सुरु केली असती तर कमीत कमी तीन साडे तीन हजार कांदा विकला असता. परंतु असे झाले तर शेतकरी मोठा होईल म्हणून जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना शेतकर्‍यांची होताना दिसत आहे.

कांद्याची अशी अवस्था असताना कापशीचे ही दर सध्या आठ हजारा भोवताली घुटमळताहेत ते देखील वाढत नाहीये. नऊ हजारांच्या पुढे दर जातील, अशी अपेक्षा बळीराजाला होती. कांद्याने जरी दगा दिला तरी कापुस आपल्याला नक्कीच तारेलं अशी अपेक्षा त्याला अजुनही आहे.परंतु राज्यकर्त्यांच्या मनात नेमके काय आहे? समजणे अवघड बनलेआहे.

ऊस शेतील फाटा देऊन शेतकरी भुसार पिकाकडे वळला कारण यांच्या तिन,तिन पीढ्या साखर कारखान्यात राज्यकरीत आहे. यांचं चांगभलं झालं पण बळीराजा मातीत गेला. म्हणून शेतकर्‍यांनी पँटर्न बदलला परंतू तेथे देखील यांनी लाँबींग करुन भुसाराचे भाव पाडून आपलं उखळ पांढरं करुन घेण्याचा डाव सुरु केला असल्याने शेतकर्‍यांना हे दिवस पाहावे लागत आहे. आणि याला सर्वस्वी कारणीभूत सरकारचे धोरणं असल्याने शेतकर्‍यांचा सरकार विषयी असंतोष वाढत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लवकर निर्यात सुरु करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या