कांदा 3500 वर ; उत्पादक खूश

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत काल बुधवारी उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात वाढ होऊन प्रति क्विंटलला 2800 ते 3500 रुपये एवढा उच्चांकी भाव मिळाला. दोन शेतकर्‍यांच्या दोन नऊ गोण्यांच्या वक्कलला 3500 रुपये दर मिळाला.

सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ समजल्या जाणार्‍या लासलगावातही कांद्याचे भाव 2700 रुपयांवर पोहोचले आहेत. गत चार पाच दिवसांपासून दिवसागणिक कांद्याच्या भावात वाढ होत असल्याने कांदा उत्पादक खूश आहेत.
नगर कृषिउत्पन्न बाजार समितीत बुधवारी 30 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. देशांतर्गत व परदेशांत कांद्यास मागणी वाढल्याने बाजारभावात  वाढ झालेली आहे.

लिलावात 1 नं. कांद्यास 2800 ते 3500 रुपये, 2 नंं. 2400 ते 2700, 3 नं. 1800 ते 2400 रुपयांचे दर निघाले. आष्टी येथील राजू विधाटे यांच्या सात गोणी आणि गंगापूर तालुक्यातील कारडगाव येथील युनूस शेख यांच्या दोन गोण्यांना 3500 असा उच्चांकी भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. मंगळवारीही पारनेर आणि घोडेगावात कांदा 2000 ते 2200 रुपये प्रतिक्विंटल विकला गेला. मागील महिन्यात शेतकर्‍यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता ग्राहकांना रडवत आहे.

आठ दहा दिवसांपूर्वी 800 ते 1000 रुपयांनी विकल्या जाणार्‍या कांद्याला विक्रमी भाव मिळू लागला आहे. कांद्याचे भाव वाढू लागल्याने व्यापारी आता शेतकर्‍यांकडून थेट कांदा खरेदी करू लागले आहेत. पण यात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी कांदा बाजार समितीतच विकावा, असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*