घोडेगावात कांदा 2000, पारनेरात 2200 रुपये

0
नेवासा (का. प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या भावाने 2000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा काल गाठला. मागील 15 दिवसापासून कांद्याच्या भावात आलेली तेजी कालच्या बुधवारच्या बाजारातही कायम राहिली. सोमवारी जास्तीत जास्त 1800 रुपये असलेला भाव काल बुधवारी 2 हजारावर गेला.
घोडेगाव कांदा मार्केटमध्ये गेल्या 15 दिवसापासून आवक व भावातही वाढ झाली. काल मात्र सोमवारच्या तुलनेत आवक घटली. काल एक नंबर कांद्याला 1400 ते 2000 रुपये भाव मिळाला. दोन नंबरला 800 ते 1350 रुपये, तीन नंबरला 300 ते 700 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 1000 ते 1300 रुपये भाव मिळाला तर जोड कांद्याला 200 ते 400 रुपये भाव निघाला. कांद्याची एकूण 43 हजार 452 गोण्या आवक झाली. सोमवारच्या तुलनेत ती 8 हजार गोण्यांनी कमी आहे. मागील जवळपास एक ते दीड वर्षात प्रथमच भाव वाढू लागल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पारनेर (प्रतिनिधी) – पारनेर बाजार समितीत बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याचे भाव आठवडा भरात 400 रूपयांनी वधारले आहे. बुधवारी 8 हजार 99 गोणी कांद्याची बाजार समितीच्या आवारात आवक झाली. एक नंबर कांद्याला 2 हजार 200 रूपये क्विंटल बाजारभाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.
गेल्या दोन आठवड्यापासून कांद्यांचे भाव दिवसेंदिवस वाढू लागले आहे. रविवारी चांगल्या कांद्याला 1 हजार 700 रूपये भाव मिळाला होता. मात्र बुधवारी त्यात वाढ होउन 2 हजार 200 रूपये उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल 2 हजार 200 रूपये, दोन नंबर 1 हजार 800 ते 2 हजार 100 रूपये, तिन नंबर 1 हजार 400 ते 1 हजार 700 रूपये, गोल्टी 1 हजार 500 रूपये बाजार भाव मिळाला.
मध्यप्रदेश, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आदी भागात पावसाने साठवलेला कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे तेथील व्यापार्‍यांनी महाराष्ट्रातून कांदा खरेदीची चढाओढ आगली आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव कोसळल्याने बाजार समितीतील कांद्याची आवक मध्यंतरी मंदावली होती. मात्र आवक वाढूनही कांद्याचे भावात वाढ होत आहे. त्यामुळे बाजारभावात तेजी आली आहे.

LEAVE A REPLY

*