नेवाशाच्या बाजारात फुकटात कांदा

0
नेवासा येथील काल रविवारच्या आठवडे बाजारात तालुक्यातील पुनतगावच्या शेतकर्‍याने फलक लावून बाजारकरुंना कांद्याचे असे मोफत वाटप केले.

भाव मिळत नसल्याने पुनतगावच्या शेतकर्‍याकडून सरकारचा निषेध

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव मिळत नसल्याने नेवासा शहरातील काल रविवारी झालेल्या आठवडे बाजारात पुनतगाव येथील एका शेतकर्‍याने भाजप सरकारचा निषेध करत कांद्याचे मोफत वाटप केले. यापूर्वी भाव मिळत नसल्याने संगमनेरातही एका शेतकर्‍याने कांदे मोफत वाटले होते. तर राहुरीत एका शेतकर्‍याने रस्त्यावर कांदा फेकून देत मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केली होती. हा फुकट मिळणारा कांदा घेण्यासाठी बाजारातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नेवासा येथील रविवारी आठवडा बाजार होता नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथील शेतकरी पोपटराव वाकचौरे यांनी एकूण 30 गोण्या कांदा बाजारात आणला होता.

कमी भाव देऊन शेतकर्‍यांना मातीत घालण्याचे काम भाजपच्या सरकारने चालविले असल्याची प्रतिक्रिया शेतकरी पोपटराव वाकचौरे यांनी यावेळी व्यक्त केली. नेवासा खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या गेटसमोर चारचाकी वाहनावर मोफत कांदा असा फलक लावून फुकट कांदे, फुकट कांदे… म्हणत कांदा चक्क फुकट वाटला. हा कांदा घेण्यासाठी गोरगरीब बाजारकरूंनी आपल्या पिशव्या भरून घेतल्या. हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कांदा विकत असताना दानपेटी देखील ठेवण्यात आली होती. कोणी आपल्या इच्छेनुसार दानपेटीत पाच-दहा रुपये टाकताना दिसत होते. कांद्याचे भाव खाली वर होत असताना तो वाळवत घालण्याची वेळ सर्वसामान्य शेतकर्‍यांवर आली मात्र भाव एक रुपया ते दीड रुपया मिळत असल्याने सरकारने केलेल्या क्रूर चेष्टेला कंटाळून हवालदिल झाल्याने पुनतगावच्या शेतकर्‍याने हा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

*