Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

एका रात्रीत तीन एकरांतील ज्वारीची कणसे गेली चोरीला

Share

नाऊर (वार्ताहर) – 3 एकर ज्वारी काढणीचा मजुरांना सौदा दिला, ठरल्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी मजूरही सोंगणी करण्यासाठी शेतात आले. मात्र रात्रीतूनच चोरट्यांनी तीन एकर ज्वारीची कणसे चोरून नेऊन शेतात फक्त ज्वारीचे उभी ताटेच शिल्लक ठेवल्याने शेतकर्‍याला कपाळावर हात मारून घेण्याची वेळ ओढवली. हातातोंडाशी आलेला घास भुरट्या चोरांनी हिसकावून नेल्याने शेतकर्‍याला अश्रू अनावर झाले.

श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद शिवारातील मारुती ताया शिंदे यांच्या मालकीच्या गट. न. 44 मधील 3 एकर उभ्या ज्वारीच्या कणसांची एकाच रात्रीत चोरी झाल्याची घटना घडली. एकीकडे मजूर मिळत नसल्याने सोंगणीस विलंब होत असून दुसरीकडे अशा पद्धतीने ज्वारीच्या कणसांची चोरी होत असल्याने शेतकर्‍यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे तर पोलिसांपुढे अशा गुन्ह्यांचा तपास कसा करायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाऊर, जाफराबाद, नायगाव या परिसरातील ज्वारी अतिशय स्वादिष्ट, गोड व रुचकर लागत असल्याने इतर भागापेक्षा येथील ज्वारीला अधिकच मागणी असते. यावर्षी तर ज्वारीला सोन्याचे मोल आले आल्याने चोरट्यांनी आता ज्वारीची चोरी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीती पसरली आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसांपूर्वी या शेतीचे मालक मारूती शिंदे यांनी आपल्या ज्वारीच्या पिकाची पाहणी करून मजुराची एकरी रक्कम ठरवून दिली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी शिंदे हे त्या मजुरांना सोंगणीसाठी घेऊन आले. मात्र आपल्या शेतात फक्त ताटेच उभी असून ज्वारीच्या कणसांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला. त्यांनी गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून मशागतीसह शेतीवर मोठा खर्च करून ज्वारीचे पीक उभे केले. मात्र या चोरीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सद्य स्थितीत सोंगणीसाठी मजुराची मोठी समस्या निर्माण झाली असून बाहेरील मजूर आणून परिसरातील सोंगणी सुरू आहे. एकीकडे या भागात बिबट्या आल्याच्या चर्चेने मजूर वर्ग देखील सोंगणीसाठी येत नसून दुसरीकडे अशा नव्याच पद्धतीने चोरी होत असल्याने परिसरातील शेतकरी मात्र धास्तावले आहेत. पोलिसांपुढे देखील या आगळ्या-वेगळ्या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
यासंदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!