Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू 

Share
सिन्नर । वार्ताहर 
दोडी शिवारात असणाऱ्या डोंगरावरील रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या तलावातील विहिरीत बुडून तालुक्यातील घंगाळवाडी येथील अमोल शरद शेलार (वय 19) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज  (दि. 27) सकाळी  6 वाजेच्या सुमारास घडली.
नांदूरशिंगोटे येथील गजानन करीयर अकॅडमी या पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत दोन आठवड्यांपूर्वी अमोल प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता.
आज पहाटे नियमित सरावादरम्यान प्रशिक्षणार्थी मुले दोडी येथील रेणुका देवी मंदिराच्या डोंगरापर्यंत गेले होते. तेथे पोहोचल्यावर पायथ्याशी असणाऱ्या तलावात पाय धुवून प्रशिक्षणार्थी मंदिरात दर्शनासाठी जात होते. तलावाजवळ आल्यावर अमोलने अंगातील कपडे काढून येथे तलावात उडी मारली व अंदाज न आल्याने तो तलावातील विहिरीत फेकला गेला असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
आव्हाड नामक शेतकऱ्याची हि विहीर असून ती तलावाच्या क्षेत्रात असल्याचे समजते. या विहिरीला बांधीव कडे असले तरी तलावात पाणी अधिक असल्याने विहिरीचा अंदाज येत नाही. पाण्यात उडी मारल्यावर अमोल पुन्हा पाण्यातून बाहेर न आल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली.
परिसरातील शेतकरी देखील आवाज ऐकून तलावाकडे धावले. मात्र विहीर खोल असल्याने व पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने कुणीही तलावात उतरायला तयार नव्हते. याबाबत वावी पोलिसांना सूचित केल्यावर सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे, उपनिरीक्षक काळे, हवालदार प्रविण अढांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तातडीने सिन्नर नगरपालिका व माळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले. या पथकांनी पाण्यात गळ टाकून शोध मोहीम सुरू केली. अखेरीस सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास विहिरीत टाकलेल्या गळाला अमोलचा मृतदेह अडकला. पाण्याबाहेर काढलेला मृतदेह पोलिसांनी दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला.
मात्र, अमोलच्या नातेवाईकांनी घडल्या प्रकाराबद्दल संशय व्यक्त केल्याने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. रात्री उशिरा घंगाळवाडी येथे त्याचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!