Type to search

Special दिवाळी विशेष - रिपोर्ताज

Exclusive: प्रतिष्ठित शेतकऱ्यांना मार्केटमधले व्यापारी करतात अरे तुरे…

Share

कमी पाऊसमान आणि येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत दिनांक १० ऑक्टो १८ रोजी शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून त्यांना आलेले अनुभव या लेखात जसेच्या तसे शब्दांकित केले आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे नाव बदलले आहे.

पंकज जोशी | देशदूत डिजिटल

‘आज फार शेतकरी आले नाहीत, त्यामुळे माझ्याकडच्या निम्म्याच कुल्फ्या विकल्या’ काल यापेक्षा जास्त धंदा झाला होता.’

दहा रुपयाला एक या प्रमाणे मार्केट यार्डमध्ये आईस कँन्डी विकणारा सांगत होता. ‘मी रोजच या ठिकाणी येतो. दुपारी गर्दी असते. शेतकऱ्यांपासून हमालांपर्यंत बरेचजण आईस्क्रीम विकत घेतात. चांगला धंदा होतो. शंभरेक कुल्फ्या विकतो. आज मात्र जेमतेम पन्नास विकल्या.’ तो पुढे सांगतो.

मार्केट यार्डातील एका मोठ्या गाळ्यात भाजीपाल्याच्या गर्दीत शेतकऱ्याच्या एखाद्या प्लॅस्टिकच्या कॅरेटवर तो बसलेला असतो. दुपारी ४ पर्यंत दोन तासांत त्याने ६०० रुपयांच्या आसपास धंदा केलेला असतो.

अर्थात असा छोटा व्यवसाय करणारा काही तो एकटा नव्हे, चहावाला, समोसावाला, वडावाला, मोबाईलचे साहित्य, की चेन- पाकिटे, छोट्या बॅटऱ्या विकणारे असे अनेक फिरते विक्रेते येथे असतात. दिवसाकाठी प्रत्येकाच्या खिशात किमान ३०० ते पाचशे रुपये पडतातच.

केवळ हे विक्रेतेच नव्हे, तर येथे काम करणारे हमाल, मापाडी, हॉटेलवाले, चणे फुटाणे विक्रेते, चहा विक्रेते, खारी बटर विक्रेते अशा किमान ५०० विविध लोकांचा उदरनिर्वाह या मार्केटयार्ड परिसरात सुखेनैव चालतो. अगदी भिकारी आणि चोर आणि भटक्या जनावरांचेही पोट हे पंचवटीतील मार्केटयार्ड भरत असते.

वेळ दुपारी २ची. मार्केट यार्डमधील लिलावांच्या गाळ्यांसमोर विविध प्रकारे टेम्पो, ट्रक, जीप, टॅक्टरची एकच गर्दी होते.

क्रेट भरभरून शेतकरी ताजा शेतमाल आणतात. त्यात दिंडोरी, पेठ, सुरगाणा, निफाड, सिन्नर अशा शेजारच्या तालुक्यांमधून येणाऱ्यांची संख्या जास्त.

काही ठिकाणी दुधी भोपळ्याचे क्रेट उतरत असतात, तर काही ठिकाणी वांग्यांच्या जाळ्या. काही क्रेटमध्ये दोडके, कारले तर काही कॅरेटमध्ये गिलके, भेंडी यासारख्या वेलवर्गीय भाज्या.

दिंडोरी तालुक्यातील एका गावाहून शिवाजी पाटील, विजय पाटील आणि विष्णू पाटील हे शेतकरी दुधी भोपळा घेऊन आलेले असतात. सर्व मिळून ४६ क्रेटस्‌.

त्यांची गाडी गाळ्याच्या ओट्याला लागलेली असते. समोर आधीच भोपळ्यांच्या क्रेटची भली मोठी रांग लागलेली असते. शेजारी कारल्याचे क्रेट उतरविण्यासाठी हमालांची गडबड चाललेली असते.

सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यावर आडत कंपनीचे हमाल त्यांचा माल उतवितात आणि दुधी भोपळ्याच्या तिसऱ्या रांगेत मध्यभागी त्यांचा माल ठेवला जातो.

हे सर्व इतक्या पटकन की आपला माल कुठल्या रांगेत हमालांनी नेला हे शेतकऱ्यांच्या लक्षातच येत नाही आणि ते हमालांनी माल नेला त्या दिशेने धाव घेतात.

लिलाव प्रक्रिया अशी होते

‘बरेचदा या ठिकाणी माल उतरवताना गडबड होते. क्रेटची अदलाबदली किंवा क्रेट पळविलेही जाते. म्हणून खूप सावध रहावे लागते. एका शेतकऱ्याचे हे काम नाही. दोघे तिघे पाहिजेच इथे,’ हमालांकडून क्रेट नीट आले ना हे तपासतच विजय पाटील आपल्याला माहिती देतात.

थोड्याच वेळात त्या मालाभोवती हमाल आणि आडत्यांचा एकच गराडा पडतो. आडत्याकडील व्यक्ती माल किती आहे? हे मोजून त्याची शेतकऱ्याकडे पावती देतो. हे सगळे होईपर्यंत आपल्या शेजारी भोपळ्याच्या क्रेटची आणखी चौथी रांग लागलेली असते आणि आपण सरकूही शकत नाही इतकी कमी जागा तेथे असते.

आजूबाजूला प्रचंड धूळ, अस्वच्छता, फिरणारी कुत्री अशा वातावरणात एका गाळ्यात हजारभर माणसं आणि शेजारीच असलेल्या हिरव्या मिरचीचा नाकात जाणारा तिखट दर्प यामुळे एव्हाना अनेकजण सटासट शिंकत असतात. इथे नेहमी येणारे काही अनुभवी लोक नाकाला रूमाल बांधतात, तर काहींना त्याचे काहीच वाटत नाही.

एव्हाना भाजी लिलावाच्या रांगेत लावून अर्धा तास होऊन गेलेला असतो. समोर दहा बाजार लोकांचा एक घोळका येतो. हाच तो व्यापाऱ्यांचा घोळका. अनेकजण भोपळे हातात घेऊन त्याचा दर्जा तपासल्यासारखा करतात.

प्रत्येक शेतकऱ्याजवळ हे लोक जातात. एकच गोंधळ आणि गलका होतो. त्या गर्दी आणि गोंधळातच मग त्यांच्यातील एकजण भराभरा किंमती पुकारतो, तीन हजार, छत्तीसशे, चार हजार…. मग एकजण तो माल घेतो आणि भोपळ्याची विक्री होते. नवख्या माणसालाच काय तर अनुभवी शेतकऱ्यालाही काहीच कळत नाही. पाच मिनिटांनंतर कळते की आपल्याला १६३ रु प्रति क्रेटचा भाव मिळालाय म्हणून.

शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे गेलेले शेतमाल

शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडे गेलेले शेतमाल

दरम्यान यातील व्यापारी आता पाटील बंधू उभे असलेल्या तिसऱ्या रांगेत येतात. ‘आता आमच्या भोपळ्यांचा लिलाव पुकारतील बघा..’ उत्साहित झालेले पाटील सांगतात.

‘क्या रे? कितना क्रेट माल है’ तोंडावर रगेल भाव असलेला पंचविशीतील एक परप्रांतीय व्यापारी चाळीशी ओलांडलेल्या आणि गावात बऱ्यापैकी प्रतिष्ठा असलेल्या पाटील यांच्या तोंडावर तुसडा प्रश्न टाकतो. कदाचित या मुजोरीची सवय असल्याने पाटील त्याकडे दुर्लक्ष करतात आणि शांतपणे ‘एक नंबरचा माल आहे..’ असे त्याला सांगतात.

माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये ९० टक्के व्यापारी हे हिंदी आणि धेडगुजरी मराठीत बोलत असतात. त्यांच्या पेहरावावरून ते परप्रांतिय असल्याचे सहज ओळखू येते. शेतकरी कितीही प्रतिष्ठीत असला, तरी शक्यतो त्याला अरे तुरेच करायचे असाच इथे एकूण पायंडा…

हे व्यापारी गेल्यानंतर थोड्याच वेळात लिलाव पुकारणारा आणि त्याच्यासोबत पुन्हा १०-१२ व्यापारी पाटील यांच्या भोपळ्यांजवळ येतात. त्यातील लिलाव पुकारणाऱ्याकडे जाळ्यांची (क्रेट) संख्या लिहिलेली सौदापट्‌टी जमा करतात.

‘किती जाळ्याहेत?’ लिलाव पुकारणारा विचारतो. ‘साडे  सव्वीस’.. पाटील यांचे उत्तर

त्यानंतर सुरू होतो लिलाव, ‘ साडे सव्वीस म्हणजे तीन हजार.. छत्तीसशे… एकोणचाळीसशे…बेचाळीसशे…’ एक व्यापारी थांबायची खूण करतो आणि बेचाळीसशेवर सौदा तुटतो. पुन्हा मग व्यापारी लिलाव पुकारणाऱ्याच्या कानात काही सांगतो आणि ४२०० ची रक्कम घटून ३९००वर येते. सौदापट्टीवर सही होते. हा सर्व खेळ ४० ते ५० सेकंदात आटोपतो.

पाटील यांच्या सौदापट्टीच्या पाठीमागे स्केचपेनने ३९०० असा आकडा आणि खाली व्यापाऱ्याची सही नाव लिहिले जाते. दहाच मिनिटांत माल विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचे हमाल तेथून भोपळ्याचे क्रेट हलवतात आणि व्यापाऱ्याच्या गाळ्यात घेऊन जातात.

आपल्याला किती भाव मिळाला हे सुरवातीला पाटील यांना कळतच नाही. भोपळ्याचे क्रेट गेल्यानंतर ते हिशेब करतात, तेव्हा एका जाळीला १४७ रुपये भाव मिळाल्याचे त्यांच्या लक्षात येते. एका जाळीत १८ भोपळे असतात. साधारणपणे एका भोपळ्याला ८ रुपये दर मिळाला.

नंतरच्या रांगेतल्या शेतकऱ्यांच्या भोपळ्यांसाठी पुढे हाच दर १०० पर्यंत खाली येतो, असे त्यांच्या बोलण्यातून समजते.

‘माझा माल चांगला होता. एक नंबर क्वालीटी, खराब भोपळे नव्हते. त्यामुळे चांगला भाव बरा मिळाला, मध्यंतरी हाच भाव २०० पर्यंत गेला होता.’ विजय पाटील सांगत होते.

पण ४२०० भाव असताना हे तीनशे रुपये का कापले? असा प्रश्न विचारल्यावर ते सांगतात की व्यापारी असेच करतात, लिलावाची रक्कम पूर्ण हातात पडतच नाही. या मालात काही खराब भोपळे असल्याचे ते कारण देतात.  त्याला बदला म्हणतात. (बागलाणमध्ये या प्रकाराला वांधा म्हणतात. पण पैसे कापण्याची पद्धत जवळपास एकच असते. )

आता शेतकरी हुशार झाले आहेत.  आपल्या मालाची प्रतवारी करूनच ते मार्केटला घेऊन येतात. मीसुद्धा प्रतवारी केली होती. पण तरीही ते किंमतीत कटती धरतातच, ते पुढे सांगू लागतात.

तिथे असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला थोड्याफार फरकाने हाच अनुभव आलेला असतो. लिलाव होऊन पैसे मिळणार याचा आनंद एकाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह…

पाटील यांच्या साडेसव्वीस क्रेटनंतर त्यांच्या भावाच्या मालकीच्या क्रेटचा लिलाव होतो. त्यावेळेस मात्र ११५ रुपये भाव मिळतो.

पहिल्या रांगेत पेठ तालुक्यातील फणसपाडा येथून वाघमारे आणि काही सहकारी भोपळा विक्रीला आणतात. त्यांना मात्र २०० रुपये भाव मिळालेला असतो.

‘आपण आधीच यायला पाहिजे होतं. पहिल्या लायनीत राहिलो असतो, तर आणखी चांगला भाव मिळाला असता, नंतर जसजसा उशिरा माल येतो, त्याला कमी भाव होत जातो. पाचव्या लायनीत तर १००च्याही खाली’, पाटील सांगत असतात.

शेतमालाचा भाव कसा ठरतो? या प्रश्नावर ते सांगतात, ‘ज्याचा माल चांगला, त्याला चांगला भाव मिळतो’.. मग पाचव्या रांगेत ठेवलेल्या तुमच्याच घरच्या बाकीच्या जाळ्यांना कमी भाव का मिळाला? माल तर एकच दर्जाचा होता..? या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येत नाही.

त्यांनाच काय, पण कुठल्याही शेतकऱ्याला भाव कसा ठरतो? पाचव्या मिनिटाला तो कमी कसा होतो? अशा कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देता येत नाही.

खरे तर अलिकडच्या काळात सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे बाजारसमित्यांमध्ये असलेली व्यापारी आणि अडत्यांची मक्तेदारी मोडली आहे. शेतकऱ्याला आता पूर्वीप्रमाणे बाजारसमित्यांमध्येच माल विकला पाहिजे याचे बंधन नाही. पण तरीही कधी मनुष्यबळ नसते म्हणून, कधी मार्केटची माहिती नसते म्हणून, तर कधी रोख पैशांची निकड असते म्हणून शेतकरी नाईलाजाने का होईना बाजारसमितीत येतो. लिलावानंतर जवळच्याच एका टपरीत चहा घेताना पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेतून या गोष्टी पुढे येतात.

एव्हाना दुपारचे चार वाजलेले असतात. अवघ्या दहा मिनिटांत चहा संपवून विजय पाटील तेथून उठतात आणि व्यापाऱ्याच्या गाळ्याकडे लगबगीने जातात. त्यांना तेथून मालाचे  रिकामे क्रेटस्‌ आणायची असतात. नंतर आडतदाराच्या पेढीवर जाऊन मालाचे पैसे घ्यायचे असतात.

आपणही त्यांच्यासोबत व्यापाऱ्याकडे जातो. एका मोठ्या गाळ्यात आरामखुर्चीला रेलून व्यापारी बसलेला असतो. समोर हिरवी मिरची, दोडके, भोपळे, काकडी अशा मालांची मोठमोठी पेटारे भरलेली दिसतात, तर काही पेटाऱ्यांमध्ये भाजी भरण्याचे काम दहा बारा कामगार करत असतात.

अर्थात व्यापाऱ्याप्रमाणेच हे कामगारही परप्रांतीय. त्यांच्यासोबत हिंदीतूनच बोलावे लागते. इथे पॅक झालेला हा शेतमाल रातोरात वाशी, दादर आणि ठाण्याच्या मार्केटला जातो, त्यातील चांगला माल दुबईलाही जातो…. आराम खुर्चीवर रेलून बसलेला तरुण व्यापारी माहिती देतो. त्याचे नाव बलदेव.

मात्र गाळ्यात आलेल्या पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांना खुर्चीवर बसा म्हणण्याचे सौजन्य तो दाखवित नाही किंवा त्यांना पाणीही विचारत नाही.

विजय आणि त्यांचे भाऊ विष्णू पाटील मग व्यापाऱ्याकडील रिकामे क्रेट वाहून सुमारे पाव किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या वाहनापर्यंते वाहून नेतात. एका चकरेत काम होत नाही, म्हणून तीनएक चकरा त्यांना माराव्या लागतात.

पाटील आणि त्यांच्या भावाचा माल अशा तीन व्यापाऱ्यांनी घेतलेला असतो. त्यापैकी पाटील यांच्या सौदा पावतीवर व्यापाऱ्याची सही असते, पण भावाच्या सौदा पावतीवर सही राहिलेली असते. ती घेण्यासाठी आणि राहिलेले क्रेट आणण्यासाठी मार्केट यार्डाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत पाटील बंधू पायपीट करतात.

त्यातील चांद नावाच्या व्यापाऱ्याकडे ते जातात. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये मिसरूडही न फुटलेला व्यापाऱ्याचा पोरगा बसलेला असतो. त्याच्यासमोर सहीसाठी पाटीलबंधू आर्जव करतात.

त्यांच्या दुसऱ्या सौदापट्टीवर ३१०० रुपये लिहिलेले असतात. पण तो तरुण व्यापारी त्यातूनही दोन-तीनशे कमी करण्याच्या प्रयत्नात असतो.

आधीच लिलाव कमी गेलेला, त्यात पुन्हा इथे पैसे कमी होणार हे पाहून पाटील बंधू हबकतात. मोठ्या मिनतवारीने पैसे कटती करण्यापासून व्यापाऱ्याला परावृत्त करतात… मग अगदी नाईलाज झाल्याप्रमाणे तो सही करतो आणि हे शेतकरी सुटकेचा नि:श्वास टाकतात.

बाजूच्याच तिसऱ्या व्यापाऱ्याकडून उरलेले रिकामे क्रेट घ्यायचे असतात. तेथे मग हे शेतकरी जातात. या ठिकाणी काही हमाल मोठ्या ढकलगाडीवर माल वाहून आणतात. पन्नाशी ओलांडलेल्या सविता घुगे त्यांच्यापैकीच एक. त्यांच्यासारख्या अनेक महिला येथे हमाली करतात.

सविताताईंना तीन मुले, एक मुलगी आणि दोन मुलगे. मोठा बीएसस्सीच्या शेवटच्या वर्षांत, तर दोन नंबरची मुलगी १२वी सायन्सला शिकते. सर्वात धाकटा ११ वी कॉमर्सला. गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या इथे हमाली करतात. त्याच कष्टातून आलेल्या पैशांत त्यांनी मुलांना शिकवले आहे.

‘मार्केटची लाईन लई बेक्कार, माझ्या पोरांना मी मुळीच या लायनीत आणणार नाही, त्यांना शिकवणार.. ‘ कामातून काही मिनिटे विश्रांती घेणाऱ्या सविताताई सांगतात. दुपारी १२ ला त्या इथे येतात. त्यांच्यासारख्या अनेक कर्तबगार महिला या ठिकाणी हमाली काम करतात. कुटुंब चालवितात. दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा क्रेट आणण्यासाठी ढकलगाड्यासोबत रवाना होतात.

अनेक महिला हमाल येथे काम करतात.

आता सायंकाळचे पाच वाजलेले असतात. मार्केट यार्डमध्ये पालेभाज्या, म्हणजेच कोथिंबीर, पालक, मेथी यांच्या गाड्या घेऊन शेतकरी येत असतात. याशिवाय फ्लॉवर-कोबी घेऊनही गाड्या येतात.

इकडे लिलावाच्या गाळ्यातच असलेल्या आडत्याच्या पत्र्याच्या केबीनसमोर पट्टीचे पैसे घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतात. विजय पाटीलही मालाचे पैसे घेण्यासाठी त्या गर्दीत शिरतात.

समोरच काकड्यांच्या लिलावाला सुरूवात होणार असते. शेकडो क्रेट काकड्या तेथे येतात.

सिन्नर तालुक्यातून एकनाथ आव्हाड हे पंचेचाळीशीतले शेतकरीही काकडी घेऊन आलेले असतात. ‘नवरात्राच्या हंगामात काकड्यांना चांगला भाव मिळतो, आमच्याकडे सध्या धरणाचे पाणी आहे, त्यामुळे बरंय’ ते सांगू लागतात.

आता पुन्हा या ठिकाणी दुपारसारखीच गर्दी होते. या गर्दीत काही भिकारी, उचले काकड्या, दोडके यासारख्या भाज्या एक-एक करून जवळच्या झोळीत टाकतात. शक्य झाल्यास शेतकऱ्याची नजर चुकवून त्याच्या क्रेटमध्ये हात घालून एखादी काकडी, भाजीही लांबवतात.

फिरत्या विक्रेत्यांचीही हातातल्या वस्तू विक्रीसाठी लगबग सुरू असते. दरम्यानच्या काळात आव्हाड यांच्या काकड्यांचा लिलाव होतो. त्यांना पावणेचारशेचा भाव मिळालेला असतो. आदल्या दिवशी हाच भाव पाचशे रुपये जाळी असा असतो. आज वांगेही तेजीत असते.‍

पावणेसहाच्या सुमारास विजय पाटील यांना माल विक्रीचे पैसे हातात पडतात. शिवाजी आणि विष्णू पाटील यांचे पैसेही तेच ताब्यात घेतात आणि बाहेर जाऊन त्यांच्या सुपूर्द करतात.

सहा वाजलेले असतात. सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत असतात. गेल्या चार तासांच्या धावपळीत आपण जेवलोच नाही याची जाणीव आता या शेतकऱ्यांना होते.

विष्णू पाटील सांगतात, की शेतकऱ्याचा दिवस असाच धावपळीचा जातो. दाढी करायलाही वेळ मिळत नाही.

भल्या सकाळी सहालाच हे शेतकरी शेतात जातात. भोपळ्याचा खुडा करणे आणि नंतर भोपळ्याला प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरणे ही कामे दुपारी १२ पर्यंत पुरतात. त्याचदरम्यान गडबडीने न्याहारी उरकलेली असते. १२च्या सुमारास माल गाडीत भरून शेतातूनच मार्केटकडे निघतो. जेवणाचं लक्षातच राहत नाही. अनेकदा एकवेळचं जेवण बुडतं.

साडेसहाच्या सुमारास ही मंडळी मग पुन्हा चहासाठी बाजारसमितीच्या गेटवर असलेल्या उडप्याच्या उपाहारगृहात येतात. हे थोडे चकचकीत उपाहारगृह असते. चहा घेताना विजय पाटील हिशेब करू लागतात.

त्यांच्या साडेसव्वीस जाळ्यांचे मिळून हमाली वजा जाता त्यांच्या हातात अडतीसशे रुपये पडतात. १५ रुपये जाळीप्रमाणे सुमारे साडेचारशे रूपये गाडीभाड्याचे होतात. भोपळ्यावर फवारायला सुमारे हजार रुपयांची पावडर लागते. हा साधारण दीड हजार रुपये खर्च वजा जाता त्यांच्या हातात साधारण तेवीसशे रुपये पडतात.

मात्र हे पैसे त्यांचे एकट्याचे नाहीत. ज्याचे शेत त्यांनी बटाईने घेतलेय त्या शेतमालकाला निम्मा वाटा म्हणजेच बाराशे रुपये द्यावे लागतील आणि यांच्या वाट्याला राहतील १२०० रुपये. म्हणजेच वर उल्लेख केलेल्या कुल्फी विक्रेत्या इतके. येथील चांगला हमालही दिवसाला सातशे आठशे सहज कमावतो.

‘आज भाव तसा चांगला मिळालाय, मध्यंतरी तर ६० रुपये जाळीपर्यंत तो खाली आला होता.’ पाटील सांगतात. दोन महिन्यांपासून मशागत, लागवड, देखभाल, मजुरी, फवारण्या अशी सर्व मेहनत करून त्यांनी भोपळा वाढवलाय. दोन दिवसाआड तो काढणीवर येतो. कधी कमी,  तर कधी जास्त भाव मिळतो. त्यांच्यासह त्यांची पत्नीही या कामात राबतात. पण ते स्वत:ची मजूरी या हिशेबात धरतच नाही. तेच काय कोणताही शेतकरी स्वत:ची आणि कुटुंबाची मजूरी धरत नाही. परिणामी नफा झाला की तोटा ते कळतच नाही.

‘आमच्या शेतकऱ्याचं असं असतं बघा, पिकलं तर खूप पिकतं, मिळालं तर खूप मिळतं, नाहीतर तीन तीन वर्ष काहीच नाही,’ चहा संपवताना विजय पाटील आपले शेतकऱ्याचे अनुभवी तत्वज्ञान सांगतात.

त्याचवेळेस तिन्हीसांज झाली म्हणून हॉटेलचा मालक गल्ल्याशेजारी लावलेल्या लक्ष्मी आणि अन्नपूर्णेच्या फोटोची पूजा करण्यात व्यस्त असतो. तर बाहेर खारी-टोस्ट पासून ते वेगवेगळे खाद्यपदार्थ विक्रेते मार्केटमधून येणाऱ्या शेतकऱ्यांची वाट पाहत असतात.

अशा कितीतरी जणांच्या पोटाला रोजगार देऊन अर्ध्यापोटी आणि अर्ध्या खिशाने शेतकरी पुन्हा गावाकडे परतायला सुरूवात करतात, तेव्हा त्यांना एकच आशा असते, ‘पुढच्या वेळेस तरी चांगला भाव मिळंल !!!

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!