Friday, April 26, 2024
Homeनाशिकदीड लाख सातबार्‍यांवर डिजिटल स्वाक्षरी बाकी

दीड लाख सातबार्‍यांवर डिजिटल स्वाक्षरी बाकी

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना सातबारांवर डिजिटल स्वाक्षर्‍यांचे काम 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 88 टक्के सातबारा उतार्‍यांवर डिजिटल स्वाक्षर्‍या झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्षात नागरिकांना घरबसल्या सातबारा मिळेल. 10 लाख 86 हजार 118 उतारे ऑनलाईन करण्यात आले आहेत. 1 लाख 53 हजार 743 सातबारा उतारे ऑनलाईन होणे बाकी आहे.

- Advertisement -

राज्यात युती सरकारच्या काळात सातबारा उतारे ऑनलाईन करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. ऑनलाईन सातबारा उतारे सरकारी कामासाठी वापरता येत नसत. अशा उतार्‍यांचा अधिकृतरीत्या वापर करता यावा यासाठी त्यावर तलाठ्याचा सही-शिक्का घेणे अनिवार्य होते. परंतु आता जिल्ह्यातील 88 टक्के सातबारा उतार्‍यांवर डिजिटल स्वाक्षर्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये 12 लाख 43 हजार 519 उतार्‍यांपैकी 10 लाख 86 हजार 118 उतारे ऑनलाईन करण्यात आले आहेत.

हे प्रमाण सुमारे 88 टक्के आहे. अजूनही 1 लाख 53 हजार 743 सातबारा उतारे ऑनलाईन होणे बाकी असून 20 डिसेंबरपर्यंत उतार्‍यांवरील डिजिटल स्वाक्षर्‍यांचे काम पूर्ण करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना दिले आहेत. एका दिवशी साधारणत: 10 ते 11 हजार उतार्‍यांवर डिजिटल स्वाक्षर्‍या करण्याचे काम सुरू असून पुढील आठ-दहा दिवसांत बहुतांश उतार्‍यांवरील स्वाक्षर्‍या पूर्ण होतील. त्यामुळे नवीन वर्षात नागरिकांना घरबसल्याच उतारे मिळतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

15 रुपयात मिळणार उतारा

संबंधित वेबसाईटवरून 15 रुपयांत हा उतारा काढता येणार असून त्यावर बारकोड असेल. नाशिक तालुक्यातील विहितगाव, शिंगवे बहुला आणि बेलतगव्हाण येथे देवस्थानच्या जमिनींचा वाद असल्याने येथील सातबारा उतारे ऑनलाईन होण्यास विलंब होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या