दीड लाख घरावर लावणार शौचालय नसल्याचे स्टिकर्स!

0

हागणदारी मुक्तीसाठी उपाययोजना, मोहिमेला सुरूवात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शौचालय नसलेली कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याने त्यांच्यापासून इतर कुटुंबांच्या आरोग्यास धोका आहे. शौचालय बांधण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरून उपाययोजन करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही अनल लाखो कुटूंबाकडे शौचालय नाही. असा दीड लाख धोकादायक कुटुंबांच्या घरावर आता स्टिकर्स चिकटवण्यात येणार आहे. स्टिकर्स लावण्याच्या मोहिमेला सुरूवात झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्यावतीने देण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्ह्यात शौचालयांची बांधकामे करण्यात येत आहे. शौचालये नसलेल्या कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले जाते. मोठ्या प्रमाणावर अभियान राबवूनही अनेक ठिकाणी नागरिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आता ही नवीन शक्कल लढवली आहे.
उघड्यावर शौचास गेल्याने विविध प्रकारचे आजार पसरतात. परंतु अनेकदा जनगागृती करूनही नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळतो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गावात प्रवेश करताच बाहेरच्या लोकांना नाक मुरडावे लागते. त्यामुळे संबंधित गावाचीही प्रतिष्ठा राहत नाही. गावची ओळख तेथील स्वच्छतेपासून होते. रस्त्याच्या कडेलाच शौचास बसून अस्वच्छता पसरवली असल्यास गावाची पत खालावली जाते.
प्रशासनाकडून त्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. उघड्यावर शौचास बसणार्‍यांविरोधात गुड मॉर्निंग पथक कार्यरत असून, उघड्यावर शौचास बसणार्‍यांवर गुन्हेही दाखल करण्यात येतात. जनजागृतीसाठी कार्यशाळा, पथनाट्ये, चौकसभा घेण्यात येतात. आता अशा प्रकारे उघड्यावर शौचास बसून सार्वजनिक आरोग्य बिघडविणार्‍या कुटुंबांच्या घरावर स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. या स्टिकर्सवर मोठ्या अक्षरात धोका हे कुटुंब उघडयावर शौचास जाते अशा प्रकारचा मजकूर असणार आहे.
जिल्ह्यात एकूण 6 लाख 43 हजार 804 कुटुंबे आहेत. त्यापैकी 4 लाख 92 हजार 776कुटुंबांकडे शौचालये आहेत. तर 1 लाख 51 हजार 28 कुटुंबांकडे शौचालय नाहीत. पहिल्या टप्प्यात ही दीड लाख शौचालय नसलेली कुटुंबं रडारवर असणार आहेत. लवकरच स्टिकर्स बसविण्याचे काम सुरु होईल. स्टिकर्स लावणार असल्याने कुटुंबाची इज्जत राखण्यासाठी का होईना नागरिक शौचालये बांधतील अशी अपेक्षा आहे.
शौचालये नसलेली कुटुंब संख्या
अकोले 13 हजार 376, जामखेड 11 हजार 673, कर्जत 12 हजार 119, कोपरगाव 9 हजार 10, नगर 13 हजार 201, नेवासा 17 हजार 799, पारनेर 53, पाथर्डी 23 हजार 914, राहता 208, राहुरी 4 हजार 528, संगमनेर 11 हजार 963, शेवगाव 10 हजार 379, श्रीगोंदा 13 हजार 341, श्रीरामपूर 1 हजार 422.

LEAVE A REPLY

*