नाशिक । प्रतिनिधी
भूमी अभिलेख विभागाने मागील दीड वर्षात 10 लाख 57 हजार 973 दाखल्यांचे ऑनलाईन वितरण केले. या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत 1 कोटी 58 लाख 69 हजार रुपयांचा महसूल जमा झाला आहे. प्रतिदाखला 15 रुपये याप्रमाणे हा महसूल मिळाला. सातबारा, 8 अ आणि फेरफार या दाखल्यांचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.
भूमी अभिलेख विभागाने नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये एकूण 12 लाख 43 हजार 519 सातबारा उतार्यांपैकी 10 लाख 86 हजार 118 उतारे ऑनलाईन दिले आहेत. हे प्रमाण सुमारे 88 टक्के आहे. अजूनही 1 लाख 53 हजार 743 सातबारा उतारे ऑनलाईन होणे बाकी आहे. येत्या 20 डिसेंबरपर्यंत या उतार्यांवर डिजिटल स्वाक्षरीची डेडलाईन देण्यात आली आहे. या सातबारा, 8 अ आणि फेरफारच्या उतार्यांसाठी नागरिकांना ऑनलाईन पैसे भरण्याची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे नागरिकांना आता हे उतारे काढण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. डिजिटलायझेशन या मोहिमेअंतर्गत सातबारा उतार्यांचे संगणकीकरण केले आहे. तसेच इ-फेरफारअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने सातबारा उतार्यावर नोंद घेतली जात आहे. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून नागरिकांना ऑनलाईन सातबारा उतारे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यानंतर आता डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू केली आहे.
राज्यात एकूण 2 कोटी 51 लाख सातबारा उतारे असून त्यापैकी सुमारे पावणेदोन लाख उतारे डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध आहेत. उर्वरित उतारेही लवकरच उपलब्ध होणार आहेत. नवीन वर्षात नागरिकांना घरबसल्या उतारे मिळतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. संबंधित वेबसाईटवरून 15 रुपयांत हा उतारा काढता येणार असून त्यावर बारकोड असणार आहे.
सातबारा, 8 अ आणि फेरफार दाखले
तालुका सरकारी कामासाठी नागरिकांसाठी दस्तऐवज
देवळा 642 70981
बागलाण 2995 125417
सुरगाणा 151 21416
त्र्यंबकेश्वर 561 31580
इगतपुरी 2745 18060
कळवण 552 29027
चांदवड 1047 67606
दिंडोरी 2797 109506
पेठ 2527 26386
मालेगाव 3325 182930
नांदगाव 356 26732
नाशिक 1985 52686
सिन्नर 6988 126546
निफाड 4720 89235
येवला 2030 46444
एकूण 33421 1024552