Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

110 कोटीच्या राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर दररोज होतेय वाहतूक कोंडी

Share

सोनई (वार्ताहर) – केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून मंजूर केलेल्या राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याची साडेसाती काही संपायला तयार नसून या रस्त्यावर सर्वात मोठी लोकवस्ती आणि बाजारपेठ असलेल्या सोनई गावाजवळ 15 दिवसांपासून दररोज वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी, शनिभक्ता बरोबरच सोनईचे स्थानिक रहिवासी आणि रस्त्याने कडेला असलेले व्यावसायिक अक्षरशः वैतागले आहेत.

वैतागलेले लोक मनातल्या मनात या यंत्रणेला शिव्याशाप देण्याव्यतिरिक्त कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात येत नसल्याने महामार्ग बांधकाम अधिकारी व त्यांच्या लाडका ठेकेदाराचे अजूनच फावत असून ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ एवढेच म्हणून गप्प बसले जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या इच्छेमुळे बिगर टोलनाका अगर काहीही कुणीही प्रयत्न आंदोलने अगर पाठपुरावा न करताही केंद्र सरकारचे निधीतून 110 कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता मंजूर झाला. वर्षभरापूर्वी शिंगणापूरपासून रस्त्याचे कामही सुरू झाले. पण पहिल्या टप्प्यापासूनच हे काम अतिशय वादग्रस्त ठरत गेले आणि रडतखडत हा रस्ता सोनई पर्यंत येऊन ठेपला तसेच वंजारवाडी, ब्राह्मणीपासून उंबरेपर्यंतही काही काम झाले.

सध्या शिंगणापूर येथे रस्ता काम चालू असून कधी खोदाई भराई व काँक्रिटीकरण असे नियोजनशून्य काम चालू असल्याने या रस्त्यावरून जाणारे प्रवासी ग्रामस्थ व भाविक सर्वच अक्षरशः वैतागलेले आहेत. सोनईत रस्त्याच्या एका बाजूने काम करून दुसर्‍या बाजूने वाहतूक चालविली जाते. परंतु येथे वाहन चालकांसाठी मार्गदर्शक फलक तसेच रस्ता दाखवणारे कर्मचारी अगर कुठलीही यंत्रणा कार्यरत नसल्याने दररोजची वाहतूक कोंडी ही डोकेदुखी झाली आहे.

यावर कोणीही लक्ष देत नाही, हेही वैशिष्ट्य आहे. अनेक वेळा रस्त्यात रुग्णवाहिका शासकीय वाहनांची कोंडी होत असून वाहतूक सुरू असली तरी काही वाहन चालक पुढे घुसण्याच्या प्रयत्नात मागचे पुढचे वाहनांचे अडचण निर्माण करून ठेवतात तर मालमोटार किंवा आरामबसमुळे एखादी दुचाकी सुद्धा रस्त्यातून जाणे मुश्कील होऊन जात आहे. स्थानिक पोलीस यंत्रणासुद्धा वाहतूक सुरळीत करण्यासाठी कधीमधी येते पण वाहतूक यांची कोंडी फुटून वाहतूक सुरू झाली की लगेच अर्धा-पाऊण तासात पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी गत होऊन जाते. पावसामुळे रस्त्यात झालेला चिखलसुद्धा वाहतूक कोंडीला साथ देत आहे. तसेच सोनई भागात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या विद्युत वितरण विभागाचे खांबांमुळे सुद्धा वाहनांचे येणे-जाणे त्रासदायक ठरत आहेत.

कौतुकास्पद सहनशीलता!
दररोज होणारी वाहतूक कोंडी व्यवसायाचा खेळखंडोबा याबाबत मनमाड वरून आलेले एक वाहनातील भाविकांनी चौकशी केली असता माहिती मिळाले वरून हे भाविक म्हणाले की या गावातील लोकांचे सहनशीलतेची कमाल आहे इतरत्र असे झाले असते तर लोकांनी प्रशासनाला तंग केले असते म्हणून सहनशिलतेचा राज्य पुरस्कार सोनई गावाला मिळायला काहीच हरकत नाही अशी उपहासात्मक प्रतिक्रिया वाहतूक कोंडीत एक तास अडकलेल्या या भाविकाने व्यक्त केली.

प्रसूतीसाठी जाणार्‍या महिलेचे हाल
तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे राहुरी-शिंगणापूर रस्त्यात झालेल्या वाहन कोंडीत प्रसूतीसाठी नेण्यात येणार्‍या एका महिलेचे वाहनही अडकलेले होते. ते वाहन मागेही घेता येत नव्हते अगर पुढेही नेता येत नव्हते. शेवटी या महिलेच्या नातलगांना सदर महिलेला उचलून घेऊन दवाखान्यात नेण्याची वेळ आली.

प्रवाशीच झाले वाहतूक पोलीस
वाहतूक कोंडी सुरळीत होत नाही म्हणून काही समाजसेवक प्रवासी आपापले वाहनातून खाली उतरून इतर वाहनचालकांना हात जोडून विनंती करीत मागेपुढे करून वाहतूक चालू करण्याचा प्रयत्न करीत असून प्रवाशानाच पोलिसाची भूमिका बजवावी लागत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!