शिवराय भारतवर्षासाठीच अर्पण

चारुदत्त आफळे यांचे निरुपण

0
नाशिक | दि. १३ प्रतिनिधी
जनतेच्या रक्षणासाठी आणि परकीय सत्ता उखडून टाकण्यासाठीच जिजाऊंनी आपला पुत्र भारतवर्षाला अर्पण करण्याचा संकल्प भवानी मातेसमोर केला. निजामाने भोसले व जाधव घराणे उद्धवस्त केल्याचा तीव्र संताप व्यक्त करताना जिजाऊंनी पुत्रप्राप्तीचे साकडे भवानीमातेला घातले. भवानीमाता प्रसन्न झाली आणि शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला, असे निरुपण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.·

गोखले एज्युकेशन सोसायटीत मंगळवारी(दि.१३) सायंकाळी शतकपूर्ती महोत्सवानिमित्त आयोजित ‘शिवचरित्र कीर्तनमालेचे दुसरे पुष्प’ आफळे यांनी गुंफताना शिवाजी महाराजांची जन्मकथा ओघवत्या शैलीत कथन केली. यावेळी संस्थेच्या सचिव आर. पी. देशपांडे यांच्या हस्ते आफळे यांचा सत्कार करण्याता आला.

शिवरायांच्या जन्मानंतर शहाजीराजांनी स्वराज्याचा पाया रचण्याचा निर्धार केला. आदिलशाही नको, निजामशाही नको आणि मुघलशाही नको अशी मनाशी खूणगाठ बांधून शहाजीराजेंनी स्वराज्याच्या दिशेने वाटचाल केली. वेळप्रसंगी निजामाशी तडजोड केली पण स्वराज्याचे स्वप्न मनात कायम ठेवले, असे ही त्यांनी सांगितले.

हिन्दू संस्कृतीत उपासना कमी होत असल्याची खंत चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली. उपासनेची आवश्यकता वाटत नाही याचा अर्थ हे एक प्रकारचे मानसिक धर्मांतर असल्याचे नयूद करताना त्यांनी उपासना आणि महाशिवरात्रीचे महत्व पूर्वरंगात विशद केले.

यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, सोसायटीच्या मानव संसाधन संचालिका डॉ. दीप्ती देशपांडे, विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी (नाशिक), डॉ. सहासिनी संत (मुंबई), पत्रकारिता विभाग प्रमुख प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे अन्य पदाधिकारी, विविध महाविद्यालये आणि शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*