बंद पोलीस चौकीत टवाळखोरांचा अड्डा

0
उंबरे (वार्ताहर) – राहुरी-शिंगणापूर फाट्यावर गेल्या दोन वर्षापासून भाविकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी अद्याप बंदच आहे. उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या या चौकीत आता पोलीस दादांऐवजी चक्क वाटमारी करणार्‍या टवाळखोरांचा अड्डा रात्री सुरू झाल्याने शनिभक्तांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. ही चौकी तातडीने सुरू करून त्यात पोलीस दादांची नेमणूक करा, अन्यथा ही चौकी तेथून हटवा, अशी मागणी शनिभक्तांनी केली आहे.
राहुरी-शिंगणापूर रस्ता दररोज भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहतो. आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या शिंगणापूरला याच रस्त्यावरून दररोज लाखो भाविक दर्शनार्थ जात असतात. शिंगणापूर फाट्यावर वाहने थांबून तेथे देवस्थानविषयी विचारपूस करताना अनेकांची याच चौकीजवळ लुटमार करण्यात आली आहे.
भरदिवसा व रात्रीही भाविकांची वाहने अडवून शनिभक्तांना फाट्यावरील याच चौकीजवळ जबर मारहाण झालेली आहे. त्यामुळे हा फाटा भाविकांच्या दृष्टीने धोकेदायक बनलेला आहे. वाढत्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या आदेशावरून व भाविकांच्या मागणीवरून राहुरी-शिंगणापूर फाट्यावर या पोलीस चौकीची दोन वर्षापूर्वी उभारणी करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र, अद्यापही या चौकीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडला नसल्याने चौकी बंदच राहिली आहे.
हा मोका साधून या चौकीतच शनिभक्तांची लुटमार करणार्‍या टवाळखोरांचा अड्डा सुरू झाल्याच्या तक्रारी भाविकांनी केल्या आहेत. फाट्यावर भाविकांची वाहने अडवून त्यांची लुटमार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. यातील अनेक भाविक परप्रांतीय असल्याने कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार करीत नसल्याने पोलीस खातेही सर्वकाही अलबेल असल्याचे सांगत साखरझोपेत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या चौकीची टवाळखोरांनी पुरती वाट लावली आहे. खिडकीच्या काचा फोडून आतमध्ये अक्षरशः उकिरडा झाला असून दयनीय अवस्था झाली आहे. या चौकीकडे पोलीस खात्याचे अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याने टवाळखोरांचे ‘उद्योग’ वाढलेले आहेत.

LEAVE A REPLY

*