पोषण आहाराचा तांदूळ लांबविण्याचा केंद्रप्रमुखांनीच केला प्रयत्न

0

शिंगवे जि.प. शाळेतील प्रकारः ग्रामस्थांनी पकडले रंगेहाथ

शिंगवे (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील शिंगवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय पोषण आहाराचा दीड क्विंटल तांदूळ केंद्र प्रमुखांनीच लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो फसला. गाडीत भरलेला तांदूळ ग्रामस्थांनी पुन्हा शाळेत ठेवला. यावेळी संबधित केंद्र प्रमुखांची ग्रामस्थांनी चांगलीच कानउघाडणी केली.
शेवटी झाल्या प्रकाराबद्दल केंद्रप्रमुखांनी माफी मागून वादावर पडदा टाकला. 2 तास हा गोंधळ सुरू होता.
दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मारूती कंपनीच्या कारमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरला जात असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी शाळेत धाव घेतली.
हा तांदूळ कुठे चालविला असा सवाल ग्रामस्थांनी केल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या केंद्रप्रमुखांनी हा तांदूळ पुणतांबा येथील शाळेत चालविल्याचे सांगितले. कुणाच्या परवानगीने तांदूळ चालविला असे ग्रामस्थांनी विचारताच सदर केंद्रप्रमुखांनी एक लिहीलेला अर्ज ग्रामस्थांना दाखविला.
मात्र तो वाचून दाखविण्यास नकार दिला. काहींनी अर्जाचे मोबाईलमध्ये फोटो घेण्याचे प्रयत्न केले असता संबंधीत केंद्रप्रमुखांनी ग्रामस्थांसमोरच तो अर्ज फाडून टाकला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी केंद्रप्रमुखांची चांगलीच कानउघाडणी केली. दोन तास शाळेत गोंधळ सुरू होता.
शेवटी आमच्या नोकर्‍यांचा प्रश्‍न आहे, तुमची माफी मागते असे म्हणून केंद्रप्रमुखांनी शाळेतून काढता पाय घेतला. ग्रामस्थांनी ही घटना जि.प.सदस्य राजेश परजणे यांना भ्रमणध्वनीवरून कळविली. संबंधित केंद्रप्रमुखांची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोपट काळे, जालिंदर निकोले, बबनराव बरवंट, मेजर चौधरी, राजेंद्र काळवाघे, गोवर्धन बर्गे, भोजराज बर्गे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*