सुरेख कलाविष्कारातून प्रगटले ‘नृत्यानुधिष्ठान’

0
नाशिक । सुरेख पद्न्यास, कलापूर्ण हस्तमुद्रा आणि चेहर्‍यावरील विविध भाव यांच्या अप्रतिम संगमाने सजलेल्या कथक नृत्याने रसिकांवर मोहिनी घातली. निमित्त होते पं. गोपीकृष्ण जयंतीच्या रजत महोत्सवाचे.

येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ऐश्वर्या पवार आणि नुतन पटवर्धन यांच्या कथक नृत्याने पंडित गोपीकृष्ण महोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफले गेले. नवदुर्गेची विविध रुपे प्रगट करून ऐश्वर्या यांनी देेेवीवंदन करत आपल्या नृत्याविष्कारला प्रारंभ केला.

माता भवानी, दुर्गा, गौरी अशा आदीशक्तींचे रुपे त्यांनी नृत्यातून अविष्कारीत केली. तिने तीनतालने तालप्रस्तुतीची सुरुवात केली. यात गतपरण, चक्रदार परण यांचा समावेश होता.

सर्व रचना पंजाब घराण्याच्या आणि उस्ताद अलारखाँ साहेबांनी रचलेल्या होत्या. संपूर्ण अभिनयात समाज रागातील ‘कोयलिया कूक सुनावे’ ही ठुमरी सादर केली. प्रियकराचा विरह, त्याचे सतत होणारे भास, बरसणार्‍या पावसात तो अडकला तर नसेल म्हणून काळजी यातून व्यक्त झाली.

त्यानंतर नूतन पटवर्धनने चौतालातील सुरेख मिलाफ असलेला पारंपारिक नृत्य सादर केले. यावेळी अभिनयातून रामायणातील प्रसंगावरून नवरसांची प्रस्तृती केली. त्यांना निसर्ग देहूकर (तबला), दिव्या रानडे (संवादीनी), आशिष रानडे (गायन), रेखा नाडगौडा आणि शितल कपोते (पढंत) ची साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन प्रियदर्शनी शिरवाडकर-आरोळे यांनी केले.

LEAVE A REPLY

*