शहरात आता फिरतेऐवजी यांत्रिकी वाहनतळ; प्रायोगिक तत्त्वावर 7 ठिकाणी वाहनतळ; 11 कोटींच्या खर्चास मंजुरी

0
नाशिक । नाशिक शहरात गेल्या काही वर्षांत वाहनांची वाढत असलेली संख्या आणि रस्त्यांवर झालेल्या गर्दीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. यावर महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती जैसे थे आहे.

याच पार्श्वभूमीवर महापालिकेने रोटरी पार्किंग (फिरते वाहनतळ) उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास ठेकेदार कंपनीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता शहरात प्रायोगिक तत्त्वावर यांत्रिकी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर यास नुकतीच महासभेने मंजुरी दिली आहे.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक काळात अखेरच्या वर्षात शहरातील वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रोटरी पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मनसेनेच्या सत्ता काळात रोटरी पार्किंग बांधण्यास नोव्हेंबर 2016 रोजीच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. परदेशातील काही प्रसिद्ध शहरांत वापरली जाणारी रोटरी पार्किंग या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली. मात्र तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही यास प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे यांत्रिकी वाहनतळाचा विचार पुढे आला असून प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी मॅकेनिकल पार्किंग (यांत्रिकी वाहनतळ) करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार या सुधारित यांत्रिकी पार्किंगसंदर्भातील प्रस्ताव नुकताच महासभेत मंजूर करण्यात आला. हा सुधारित प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वीच महापालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे.

महापालिकेने यांत्रिकी वाहनतळ उभारण्यासाठी सुरू केलेल्या प्रक्रियेत शहरात पहिल्या टप्प्यात केवळ सात ठिकाणीच हे वाहनतळ उभाण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या सात ठिकाणी यांत्रिकी वाहनतळ यशस्वी झाल्यास दुसर्‍या टप्प्यात इतर ठिकाणी हे वाहनतळ उभारले जाणार आहे.

या कामाकरिता 11 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास या योजनेंतर्गत या मूळ मंजूर प्रकल्पास 10 कोटी रु. खर्च असून यात शासनाचा सहभाग 50 टक्के आणि महापालिकेचा सहभाग 50 टक्के असा आहे.

म्हणजे याकरिता शासनाकडून 5 कोटी रु. उपलब्ध होणार असून उर्वरित खर्च महापालिका वाहतूक नियंत्रक कक्षअंतर्गत 6 कोटी रु. अशा सहभागास मंजुरी घेण्यात आली आहे. या महासभेतील मंजुरीमुळे आता शहरात गर्दीचा भाग असलेल्या परिसरात 7 यांत्रिकी वाहनतळे होणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यात काहीसा हातभार लागणार आहे. त्याचबरोबर वाहतुकीलादेखील शिस्त लागणार आहे.

LEAVE A REPLY

*