आश्रमशाळांमधील सोयीसुविधांवर आता पालक समित्यांचे राहणार लक्ष

वि.जा.भ.ज. आश्रमशाळांसाठी जिल्हानिहाय पालक समित्या स्थापणार- - प्रा. राम शिंदे

0

मुंबई, दि. 27: विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर तसेच तेथील व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी विजाभज आश्रमशाळांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पालक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन या समित्यांची रचना जाहीर केली आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाअंतर्गत राज्यात अनुदानीत तत्वावर विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत आश्रमशाळा चालविण्यात येतात. त्यामध्ये विजाभज प्रवर्गाच्या मुला-मुलींसाठी 526 प्राथमिक आश्रमशाळा, 296 माध्यमिक आश्रमशाळा, 148 कनिष्ठ महाविद्यालये, तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी 4 निवासी शाळा व एका विद्यानिकेतनचा अशा एकूण 975 आश्रमशाळांचा समावेश आहे.

काही आश्रमशाळांमध्ये विद्यार्थींनींबाबत घडणारे अनुचित प्रकार, गैरसोयी, विविध भौतिक सुविधांचा अभाव, शैक्षणिक, निवासी व आरोग्य विषयक सुविधांचा अभाव तसेच भोजन आदींबाबत तक्रारी आल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांना सुरक्षित वातावरणात शिकता यावे, आश्रमशाळांच्या व्यवस्थापनावर लक्ष रहावे, यासाठी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात पालक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.

त्यासंबंधीचे परिपत्रक विभागाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्यामार्फत ही समिती स्थापन होणार आहे. या समितीमध्ये एकूण सात सदस्य राहणार असून सहायक आयुक्त हे सदस्य सचिव असणार असून समितीमधील एकाची अध्यक्ष म्हणून निवड समितीच करणार आहे.

या समितीचा कालावधी 2 वर्षे किंवा सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे पुढील आदेश होईपर्यंत असणार असून समितीची बैठक दर तीन वर्षांनी होणार आहे. या समितीमध्ये या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्या, सेवानिवृत्त अथवा शासकीय कर्मचारी, समाज कल्याण/महिला बालविकास विभागाअंतर्गत कार्य करणारे लोकप्रतिनिधी, आशा वर्कर, प्राध्यापिका, शिक्षिका, स्त्री रोग तज्ज्ञ, वकिल, बालमानस तज्ज्ञ आदींचा समावेश करण्यात येणार आहे.

विजाभज आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना नियमानुसार सोयीसुविधा मिळतात की नाही, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा भागविल्या जातात का. पुरेसा सकस नाश्ता व जेवण मिळते का आदींचा आढावा ही समिती घेणार आहे. तसेच आश्रमशाळांचे व्यवस्थापन योग्यरितीने चालविण्यासाठी ही समिती शासनास शिफारसही करु शकणार आहे. तसेच प्रत्येक बैठकीनंतर समितीने प्रादेशिक उपायुक्त यांना अहवाल देणे आवश्यक असणार आहे.

या समितीच्या स्थापनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयीसुविधा व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. लवकर या समित्यांचे काम सुरू होईल, असे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*