494 ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीच्या नोटिसा

0

जिल्हाधिकारी : अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2017 या कालावधीत झालेल्या 205 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत वारंवार सूचना आदेश देऊनही 494 ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक खर्च सादर केलेला नाही. या सदस्यांची 27 ते 29 दरम्यान जिल्हाधिकारी सुनावणी घेणार असून त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेेंबर महिन्यांत जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत 4 हजार 848 जणांनी निवडणूक लढविली होती. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात केलेला खर्च निवडणुकीनंतर सादर करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले होते. निवडणूक खर्च सादर न करणार्‍या उमेदवारांची जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन त्यात दोषी आढळणार्‍या उमदेवारांवर पुढील पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे.
वारंवार सूचना आदेश देऊनही जिल्ह्यातील 494 उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर केलेला नाही. या उमेदवारांना जिल्हा निवडणूक शाखेच्यावतीने आता नोटिसा देण्यात आल्या आहेत. या सर्वांची 27 ते 29 डिसेंबरदरम्यान जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे. त्यानंतर दोषी आढळणार्‍यांवर निवडणूक लढविण्यास अपात्रतेची कारवाई होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

खर्च सादर न करणारे सदस्य –
अकोले 9, संगमनेर 46, कोपरगाव 69, राहाता 21, राहुरी 1, नेवासा, नगर 81, पारनेर 175, शेवगाव 9, कर्जत 18, जामखेड 8, श्रीगोंदा 17 यांचा समावेश आहे. श्रीरामपूर आणि पाथर्डी तालुक्यातील एका सदस्याचा यात समावेश नाही. 

LEAVE A REPLY

*