नॉर्वेच्या डिजिटल क्रांतीत भारतीय संस्थांचा मोठा वाटा – महावाणिज्यदूत ॲन ओलेस्टड

0
नाशिक, दि.29 |   नॉर्वेच्या डिजीटल विकासात भारतीय संस्थांचा मोठा सहभाग आहे.  भारत हा नॉर्वेप्रमाणे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न देश असून ऊर्जा, पायाभूत सुविधा, पर्यावरण, संरक्षण आदी क्षेत्रात दोन्ही राष्ट्रात सहकार्याचे वातावरण असल्याचे प्रतिपादन नॉर्वेच्या महावाणिज्यदूत ॲन ओलेस्टड यांनी केले.

नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या संवाद साधत होत्या.

यावेळी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, मनपा आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, स्मार्ट सिटी एलेट्सचे जोसेफ मॅक्वील, दिनकर पाटील, वसंत गिते आदी उपस्थित होते.

नाशिक शहर स्मार्ट  करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच शहर विकासाचे सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे. देशात एकूण 98 शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. राज्यातील नाशिकसह विविध शहरात प्रकल्पाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग करून महानगरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल. असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व  लाभक्षेत्र विकास मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीने परिपूर्ण जीवनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनही त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. भविष्यात ‘स्मार्ट शहर’ अशी ओळख प्रस्थापित करण्यात नाशिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकासकामांसोबत ‘गोदापार्क’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच अर्थकारणालाही गती मिळेल. नागरिकांनादेखील मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चांगल्या विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

शहराच्या सौंदर्यासोबत स्वच्छतेलाही महत्व दिले जात असल्याचे सांगून परिषदेच्या माध्यमातून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी नव्या संकल्पना पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापौर भानसी यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रोड’ तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. अशोकस्तंभ ते मॉडर्न सर्कल दरम्यान पहिल्या रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे त्या म्हणाल्या.

श्री. झगडे म्हणाले, गेल्या 200 वर्षात शहाराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरीकरण वेगाने होत असतांना शहर विस्ताराचे योग्य नियोजन होणे गरजेचे असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तेवढाच महत्वाचा आहे. नियोजनाद्वारे रोजगार आणि संपत्तीची निर्मिती, उत्तम मानव विकास निर्देशांक आणि शाश्वत पर्यावरण संवर्धन या बाबी स्मार्ट शहरासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील मुलभूत समस्या दूर करूनच शहर स्मार्ट करता येणे शक्य असल्याचे सांगून शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, रोजगार, वाहतूक, आवास अशा विविध पैलूंचा विचार या संदर्भात होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी श्री.जोसेफ, आयटीडीपीचे हर्शद अभ्यंकर, युएसटी ग्लोबचे कार्तिक हरिहरन यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विविध पैलूंबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

प्रास्ताविकात डॉ.कृष्णा म्हणाले, नागरिकांना शहराचे आकर्षण वाटावे अशा सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी नदीघाट विकास, सीसीटीव्ही आणि इतरही प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून लवकरच ई-प्रमाणपत्र सुविधा सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*