Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

ज्येष्ठांना ‘मनरेगा’चा आधार; सर्वाधिक संख्या अहमदनगरमध्ये

Share

नाशिकरोड । संजय लोळगे

ग्रामीण भागातील अकुशल बेरोजगारांना किमान रोजगार मिळावा या उद्देशाने सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबण्यात येते. सन 2018-19 वर्षाच्या या योजनेच्या अहवालानुसार ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात ही योजना ‘आधार’ ठरली आहे. नाशिक विभागातील 50,252 ज्येष्ठ नागरिकांना या योजनेतून रोजगार मिळाला आहे.

विभागातील नाशिक जिल्ह्यात 6,858, अहमदनगर जिल्ह्यात 14,114, धुळे जिल्ह्यात 11,227, जळगाव जिल्ह्यात 6,607 तर नंदुरबार जिल्ह्यात 11,446 असे मिळून 50,252 ज्येष्ठ नागरिकांना ‘मनरेगा’अंतर्गत रोजगार मिळाला आहे.

रोहयो कामांवर जाणार्‍या ज्येष्ठांची सर्वाधिक संख्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अहमदनगर जिल्ह्याच्या तुलनेत जवळपास निम्मेच आहे. वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या ज्येष्ठांचासुद्धा या योजनेत समावेश आहे. साहजिकच उतारवयातसुद्धा ग्रामीण भागातील कामगारांना ही योजना ‘आधाराची काठी’ ठरली आहे.

कुटुंबासाठी घरातील ज्येष्ठ माणसे मार्गदर्शक म्हणून मोठा आधार ठरतात. त्यांच्या अनुभवाचा उपयोग कुटुंबाला मिळतो. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबतात. विविध समाजोपयोगी कामे केलीही जातात.

शहरी भागात ज्येष्ठ नागरिक संघ ही संस्कृती चांगलीच रुजली आहे. ग्रामीण भागात मात्र ज्येष्ठांना आजही दोन वेळच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी कष्टाचीच कामे करावी लागतात. रोजगार हमी योजनेच्या मनरेगाच्या अहवालातील कष्टकरी ज्येष्ठांची संख्या नजरेत भरणारी असून चिंतीत करणारी आहे. शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठांमधील हा विरोधाभास चिंतनाचाही विषय ठरण्यासारखा आहे.

अठरा वर्षांआतील व्यक्तींनी कष्टाची कामे करणे हा बालकामगार कायद्यानुसार गुन्हा ठरवला जातो. याउलट दुसरीकडे वयाची साठी ओलांडलेल्या नागरिकांना आजही रोजगार हमीच्या कामांवर घाम गाळावा लागतो ही बाब देशातील आर्थिक विषयमतेवर पुरेपूर प्रकाश टाकते.

ग्रामीण भागात बहुतेक सामान्य कुटुंबातील लोकांचे पोट मोलमजुरीवरच अवलंबून असते. मिळणार्‍या पैशातून कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागत नाहीत. म्हणून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घरातील ज्येष्ठ मंडळीसुद्धा वयाचा बाऊ न करता ‘मनरेगा’च्या कामांवर जाणे पसंत करीत आहेत.


ज्येष्ठांना मिळालेला रोजगार

जिल्हा               वय (61 ते 80)                 80 वर्षांवरील           एकूण

अहमदनगर        13820                             294               14114
धुळे                 11031                             196               11227
जळगांव              6500                             107                6607
नंदुरबार             11216                            230                11446
नाशिक               6773                              85                 6858

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!