Type to search

Featured maharashtra

रेडी बंदरावरील जहाजातील चीनी प्रवाशांसह अन्य कोणाला कोरोनाची लक्षणे नाही; भीती न बाळगण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Share

मुंबई :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरावर सिंगापूर येथून आलेल्या मालवाहू जहाजावर असलेल्या १० चिनी व्यक्तींनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी चीन सोडले आहे. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी मुंबई पोर्ट वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली असून त्यापैकी कोणालाही कसलीही लक्षणे नसल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत राज्यात भरती करण्यात आलेल्या ३६ पैकी ३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उरलेल्या ५ जणांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. काल संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती करण्यात आले. जिल्हा रुग्णालय, जळगाव येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवासीही करोना करता निगेटिव्ह आढळला आहे.

सध्या रुग्णालयात भरती असलेल्या ६ जणांपैकी प्रत्येकी २ जण मुंबई येथील कस्तुरबा आणि पुणे येथील नायडू रुग्णालयात भरती आहेत तर प्रत्येकी १ जण नवी मुंबई आणि सांगली येथे दाखल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रेडी बंदरावर आलेल्या जहाजात एकूण २२ व्यक्ती आहेत. या जहाजाने ३ आठवड्यापूर्वी सिंगापूर सोडले आहे, तर यातील चिनी व्यक्तींनी सुमारे ३ महिन्यांपूर्वी चीन सोडलेले आहे. रेडी बंदरावर पोहचल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या वैद्यकीय पथकाने देखील या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. या बोटीवरील कोणीही करोना संशयित नसून त्या बद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २१ हजार २०३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १५१ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ७२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!