स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही आदिवासी गावंधला स्मशानभूमी शेड नाही

0

हरसूल (वार्ताहर) ता. ५:

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षा नंतरही ग्रूप ग्रामपंचायत गावंध ता. पेठ येथील स्मशानभूमी शेडची विवंचना संपता संपत नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

पेठ तालुक्यातील गावंध ग्रुप ग्रामपंचायतीत गावंध,  बर्डापाडा, पळशी,  खोकरीपाडा आदी गावांचा समावेश होतो.

जेमतेम १८००ते१९०० लोकवस्तीची ग्रामपंचायत आहे. अद्यापही या ग्रामपंचायत क्षेत्रातील स्मशानभूमीना शेड नसल्याने ग्रामस्थांना मोठा मनःस्ताप सहन करत अंत्यसंस्कार करावे लागत आहे.

सद्य स्थितीत पाऊस पडत असल्याने अंत्यसंस्कारासाठी प्रेताच्यावर ग्रामस्थांनी झोपडी तयार केली आहे. झाडाच्या डाहाळ्यांचा वापर करण्यात येत आहे.

बर्डापाडा येथील ग्रामस्थ पांडुरंग लहारे म्हणाले, की  माझ्या  वडीलांचे निधन झाले त्यादिवशी पावसाची संततधार होती. अंत्यसंस्कार करण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आला होता. ही आमच्या गावची मोठी शोकांतिका आहे.

स्मशानभूमीसाठी ग्रामसभेत वेळोवेळी ठराव सहमत करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात .मात्र ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे देत ग्रामसेवक वेळ मारून नेतो. नेमकं प्रेताच्या टाळूवरची लोणी चोरून खाल्ली कुणी? अद्यापही स्मशानभूमीची ही कुचंबना का थांबत नाही? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे.

सन २०१० साली स्मशानभूमीच्या शेडसाठी प्रस्ताव पाठविला आहे. लोकप्रतिनिधी यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा करत आहे. तसेच जून २०१७ मध्ये यासंदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यावर पुढे काहीच कार्यवाही होत नसल्याची माहिती ग्रामसेवक खरपडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*