नगर-श्रीरामपूरच्या 14 मंडळांची परवानगी नाकारली

0

नगरच्या आजी-माजी आमदार पुत्रांसह जिल्ह्यात 300 जणांना प्रवेश बंदी

अहमदनगर, श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्या-त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने संवेदनशील असणार्‍या 300 व्यक्तींना त्यांच्या भागात, परिसरात 14 दिवसांसाठी प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. यात नगरचे माजी आ. अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यासह आ. अरुण जगताप यांचा मुलगा अ‍ॅड. सचिन जगताप यांचा समावेश आहे. दरम्यान, वेगवेगळ्या कारणावरून नगरमधील 10 आणि श्रीरामपूरच्या 4 गणेश मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

गणेशोत्सवावरून नगर आणि श्रीरामपुरात प्रशासन विरोधात गणेश मंडळ असा वाद रंगला आहे. नगर शहरात मोहरम आणि गणेश उत्सव एकाचवेळी आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे हे उत्सव शांततापूर्ण मार्गाने पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी नगरमध्ये मोहरम मार्गावर असणार्‍या आणि गेल्यावर्षी परवानगी न घेता मंडप उभारणार्‍या दहा गणेश मंडळांवर यंदा मनपा प्रशासनाने कारवाई करत त्यांची मंडप उभारणीची परवानगी नाकारण्यात आली आहे. जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडे 1 हजार 279 मंडळांनी मंडप उभारणीसाठी परवानगी मागितली होती. यापैकी 1 हजार 235 मंडळांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. 14 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली असून यात श्रीरामपुरचे चार आणि नगर शहरातील 10 मंडळाचा समावेश आहे. उर्वरित 30 मंडळाची परवानगी अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, श्रीरामपुरात पोलिस प्रशासनाने वाहतुकीच्या कोंडीचे कारण पुढे करून मेनरोडवरील श्रीराम तरूण मंडळासह चार गणेश मंडळांना रस्त्यावर मंडप टाकण्यास परवानगी नाकारली होती. मंगळवारी जिल्हाधिकारी राहुल द्विदेवी व जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत श्रीरामपुरात झालेल्या बैठकीतही मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी हा विषय मांडून नेहमीच्या जागेवर गणेशाची स्थापना करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावर स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. मंगळवारी रात्री महसूल व पोलिस प्रशासनाने या मंडळाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली मात्र दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मार्ग निघाला नाही.

काल (बुधवार) दुपारी श्रीराम तरूण मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये, भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह सर्व मंडळाच्या निवडक कार्यकर्त्यांची अपर पोलिस अधिक्षक रोहिदास पवार यांच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी पोलिस उप अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शहर पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट उपस्थित होते.
यासंदर्भात रात्री उशीरापर्यंत तोडगा काढण्याचे काम सुरू होते. नगर शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या राखण्यासाठी संवेदनशील असणार्‍या 300 व्यक्ती यांना त्यांच्या भागात परिसरात 14 दिवसांसाठी प्रवेश बंद घालण्यात आलेली आहे. सोमवार दि.10 ते सोमवार दि.24 पर्यंत या व्यक्तींना त्यांच्या भागात प्रवेश बंदी राहणार आहे. हे आदेश नगरच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी काढले आहेत. यात नगर शहरातील नगरचे माजी आ. अनिल राठोड यांचा चिरंजीव विक्रम राठोड यांच्यासह विधान परिषदेचे आ. अरूण जगताप यांच्या मुलगा अ‍ॅड. सचिन जगताप यांचा समावेश आहे. यासह नगरमधील रशिद दंडा, वादग्रस्त श्रीपाद छिंदम, विशाल हुच्चे, अझर शेख, बंटी ढापसे, सागर डोंगरे, सचिन शिंदे, गणेश कोतकर, विजय पटारे यांचा समावेश आहे.

पोलीस ठाणेनिहाय परवानगी
कोतवाली 377, भिंगार कॅम्प 35, एमआयडीसी 71, नगर तालुका 51, सुपा 3, पारनेर 18, बेलवंडी 21, श्रीगोंदा 65, कर्जत 17, जामखेड 14, पाथर्डी 31, शेवगाव 74, नेवासा 15, शिंगणापूर 5, सोनई 26, लोणी 20, राहाता 5, शिर्डी 42, कोपरगाव 16, कोपरगाव शहर 42, राहुरी 92, श्रीरामपूर शहर 35, श्रीरामपूर तालुका 26, संगमनेर शहर 60, संगमनेर तालुका 37, राजुर 5, अकोले 19, घारगाव 24, आश्‍वी 29 असे 1 हजार 235 मंडळाचा समावेश आहे.

परवानगी नाकारलेली गणेश मंडळे
बागपट्टीचा राजा, नवग्रह प्रतिष्ठान, शिवराज युवा प्रतिष्ठान, शंभुराजे प्रतिष्ठान, शिवगर्जना प्रतिष्ठान, नेता सुभाष प्रतिष्ठान, शक्ती मित्रमंडळ, जय भवानी मित्र मंडळ, युनिटी फ्रेंड सर्कल, राजमुद्रा युवा प्रतिष्ठान यांचा समावेश आहे.

 

 

LEAVE A REPLY

*