Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये ‘नो कोरोना’; आतापर्यंत ३१ रुग्णांचे अहवाल आले आहेत ‘निगेटिव्ह’

नाशिकमध्ये ‘नो कोरोना’; आतापर्यंत ३१ रुग्णांचे अहवाल आले आहेत ‘निगेटिव्ह’

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये आतापर्यंत ३१ कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये आजच्या चार अहवालांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा शिरकाव जगाच्या कानाकोपऱ्यात होऊ लागला आहे. यापार्श्वभूमीवर सर्वत्र काळजी घेतली जात आहे.

- Advertisement -

नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तसेच नाशिकमध्ये बाहेरच्या देशातून प्रवास करून येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे खबरदारी घेत अनेक संशयितांची नमुने तपासणीसाठी पाठवले होते.

दरम्यान, आज चार रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास नाशिकमधील सर्वच कोरोना संशयित रुग्ण निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्हा प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, तर गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आल्या आहेत. अनेक विवाह सोहळे रद्द करण्यात आले आहेत तर अनेकांनी हळदीच्या दिवशीच बोहल्यावर चढत लग्न लावले आहे.

सर्वत्र खबरदारी घेतली जात असतानाच आज आलेले चारही संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे. परंतु उद्याचा धोका लक्षात घेता नाशिककरांनी आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच स्वच्छता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या