ना नियम ना कोरोनाची भीती; मालेगावात सोशल डिस्टन्सीचा बट्ट्याबोळ

ना नियम ना कोरोनाची भीती; मालेगावात सोशल डिस्टन्सीचा बट्ट्याबोळ

मालेगाव । प्रतिनिधी

नुकतेच मालेगाव पोलिसांनी सशस्त्र संचलन केले होते. नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले असतानाही आज मालेगावात अक्षरश: सोशल डीस्टन्सीचा बट्ट्याबोळ झालेला बघावयास मिळाला. शहरातील स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, देना बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकांच्या बाहेर जनधन योजनेतील लाभार्थींंनी गरीब कल्याण योजनेतील पॅकेज अंतर्गत खात्यावर आलेले पैसे काढण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

सुरक्षित अंतर ठेवून उभे राहण्याचे कुठलेही नियम पाळले गेल्याचे दिसून आले नाही. महिला देखील मोठ्या प्रमाणात लहान मुलांना घेवून बँकेच्या बाहेर रांगा लावत एकच गर्दी करून उभ्या असल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन सर्वच शासकीय यंत्रणांतर्फे सातत्याने केले जात असले तरी बँकांबाहेर तसेच अनेक रस्त्यांवर, गल्लीबोळ तसेच मोहल्ल्यांमध्ये संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करीत नागरीक, महिला फिरत असल्याने विनाकारण फिरणार्‍या या लोकांवर पोलीस प्रशासन यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सर्वथरातून केली जात आहे.

आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी महिला, पुरूषांनी बँकांबाहेर एकच गर्दी सकाळपासून केली होती. सुरक्षित अंतर ठेवून नागरीकांनी उभे राहावे यासाठी कुठलीही उपाययोजना सदर बँकांतर्फे करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याच्या निदर्शनाची पायमल्ली होत असल्याचे चित्र या बँकांच्या बाहेर दिसून आले.

वैद्यकिय, किराणा आदी अत्यावश्यक कामांसाठीच घराबाहेर पडण्याचे स्पष्ट निर्देश असतांना देखील भाजीपाला घेण्यासाठी दररोज शहरातील अनेक भाजीबाजारांमध्ये व रस्त्यांवर गर्दी उसळत आहे. या भाजीबाजारांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याचे कुठलेही नियम दुकानदार व नागरीकांकडून पाळले जात नसल्याची तक्रार परिसरात घरात राहणार्‍या नागरीकांतर्फे केली जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात थांबणे व अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडल्यास दोन नागरीकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे अत्यंत आवश्यक असतांना या सुचनेची पायमल्ली सर्रास केली जात असल्याने विनाकारण घराबाहेर फिरणार्‍यांविरूध्द पोलीस यंत्रणेने कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करावेत. तसेच बँकेच्या व्यवस्थापकांनी देखील पैसे काढण्यासाठी येणार्‍या खातेदारांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी सर्वथरातून केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com