सुनियोजित शहरविकासासाठी एनएमआरडीएची भूमिका महत्त्वाची- विभागीय आयुक्त महेश झगडेंकडून सादरीकरण

0
नाशिक। मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिक शहराच्या विकासाचा वेग कमीच आहे. सुनियोजित शहर विकासासाठी एनएमआरडीए अर्थात नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीलाही सुरुवात होईल, असे प्रतिपादन विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे यांनी केले.

हॉटेल गेट वे येथे त्यांनी एनएमआरडीएचे सादरीकरण करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, उपायुक्त उन्मेष महाजन, आमदार सिमा हिरे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, समन्वयक संजय सोनवणे, क्रेडाईचे मानद सचिव उमेश वानखेडे, निमाचे सचिव उदय खरोटे, नाईसचे अध्यक्ष विक्रम सारडा, क्रेडाईचे उपाध्यक्ष राजू ठक्कर, दिग्विजय कपाडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी झगडे यांनी विविध पैलूंचा वेध घेतला. जागतिक स्तरावर उद्योग, लोकसंख्या, प्रदूषण, रोजगारनिर्मिती याबाबत भेडसावणार्‍या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. नाशिक शहराच्या एकूणच विकासावर भाष्य करताना ते म्हणाले की, एनएमआरडीए नाशिकच्या एकूण 2 हजार 649.14 किमी चौरस मीटर क्षेत्रासाठी काम करेल. यात चारही दिशांना एकूण 40 किमी क्षेत्राचा विचार करण्यात आलेला आहे. त्याची सिमानिश्चीतीही झालेली असून त्या आखत्यारित प्रामुख्याने औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्याचा विचार होईल.

नाशिकमधील उपलब्ध परिस्थितीचा विचार करता याठिकाणी औषधे, इलेक्ट्रॉनिक गुडस, सरंक्षण सामुग्री तयार करणारे उद्योग येण्याची गरज आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी एनएमआरडीएमध्ये नियोजन करण्यात येईल. जर उद्योग आले तरच रोजगार निर्मिती होईल. रोजगारनिर्मिती होवून प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढले तरच अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

त्यामुळे सर्वात आधी उद्योगवाढीला चालना देण्यासाठी तयारी करावी लागणार आहे. हे प्राधिकरण शहर विकासासाठी स्वतंत्रपणे काम करणार आहे. परंतु ते करतांना ते महापालिकेच्या अधिकारात हस्तक्षेप करणार नाही. सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांचे अधिकार मात्र या संस्थेकडे येतील.

त्याद्वारे एकाच छताखाली विकास नियमावली, आराखडा तयार करून भूसंपादन, शहर वाहतूक, रस्ते विकास, पुलांची निर्मिती केली जाईल. याशिवाय तालुक्यांची कनेक्टीव्हीटी वाढवतांनाच आंतरराज्य, राष्ट्रातील महत्त्वाची शहरे तसेच आंतरराष्ट्रीय कनेक्टीव्हीटीसाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुख्यमंत्री या समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या देखरेखीत हे काम केले जात आहे.

शहराचा विकास करताना ते औरंगाबाद, मुंबई, पुणेसारखे कॉपी पेस्ट नको त्याची स्वतंत्र ओळख जपतानाच विकास होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या सादरीकरणाच्या सुरुवातीला निमा, के्रडाईतर्फे विभागीय आयुक्त महेश झगडे, उपायुक्त उन्मेष महाजन, नगररचना उपसंचालक प्रतिभा भदाणे यांचे स्वागत करण्यात आले.

उपाध्यक्ष मंगेश पाटणकर, बांधकाम व्यावसायिक जितूभाई ठक्कर, क्रेडाईचे माजी अध्यक्ष किरण चव्हाण, दीग्विजय कापडीया, उमेश वानखेडे, ज्ञानेश्वर गोपाळे, डॉ. उदय खरोडे, धनंजय बेळे यांसह मोठ्या संख्येने उद्योजक, बांधकाम व्यावसायिक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैशाली बालाजीवाले यांनी केले.

LEAVE A REPLY

*