अधिकारी-कर्मचार्‍यांवर स्वेच्छानिवृत्तीसाठी दबाव

0
नाशिक | दि. ७ प्रतिनिधी – महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पाठीशी असून अधिकार्‍यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत असून याबाबत आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना कर्मचारी अधिकार्‍यांसह रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी दिला आहे.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अध्यक्ष तिदमे यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेण्याची सूचना केली. नाशिक महानगरपालिकेत अगोदरच दोन हजाराहून अधिक रिक्त पदे आहेत. यात दरमहा अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने ते अतिरिक्त कामाचा बोजा घेऊन काम करत आहेत.

मात्र महापालिकेत सध्या अधिकार्‍यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढत आहे. पुरेसे अधिकारी आणि कर्मचारी नसताना विषय समित्या, त्यांचे सभापती, पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक अशा विविध पातळीवर प्रत्येकाची मर्जी सांभाळणे अधिकारी आणि कामगारांना कसे शक्य होणार?

संपूर्ण नाशिक महानगरपालिकाच आऊटसोर्सिंगच्या नावाखाली ठेकेदारांच्या ताब्यात देण्यासाठीच अधिकार्‍यांवर स्वेच्छानिवृत्तीचा दबाव वाढवण्यात येत आहे. दोन वर्षांत तब्बल ११ अधिकार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ही कायम नाशिक महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पाठीशी असून अधिकार्‍यांनी आणि कर्मचार्‍यांनी कुणाच्याही दबावाला बळी पडून स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये.

मनपातील उच्च अधिकारी असो की कर्मचारी ज्याच्यावरही कुणी दबाव टाकत असेल त्यांनी त्वरित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन तिदमे यांनी या पत्रकात केले आहे. एकूणच या प्रकरणात आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना अधिकार्‍यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा तिदमे यांनी दिला आहे.

संघटनेकडून कामबंद आंदोलनाची तयारी
महापालिकेत अलीकडच्या काळात अधिकारी व कर्मचारी दबावाखाली काम करीत असून याचा प्रत्यय कामातून येत आहे. यातूनच स्वेच्छानिवृत्तीचे प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर आता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पहिल्या टप्प्यात कामबंद आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

नोकर भरतीला मंजुरी मिळवावी
महापालिका ठेकेदारांच्या घश्यात घालण्यापेक्षा राज्यातही सत्ता असणार्‍या पदाधिकार्‍यांनी महापालिकेत नोकर भरतीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून आणावी. त्यातून अनेकांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध होऊन अनेक बेरोजगारांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. कुणाला नोकरी सोडण्यास लावण्यापेक्षा कुणाला रोजगार देता येतो का? याचा विचार अधिक व्हावा, अशी अपेक्षाही नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*