मनपा सफाई कामगाराची हत्या

0
पंचवटी | दि. ३१ प्रतिनिधी – नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. एकलहरा परिसरांत तरुणीच्या हत्येचा प्रकार ताजा असतांनाच आज सकाळी पंचवटीतील रामवाडी, कोशिरेमळा परिसरांत नदीकाठावर ३८ वर्षीय मनपा कर्मचार्‍याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकर्‍यांनी तरुणाची धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अरुण अशोक बर्वे (वय.३८ रा.स्नेहलपार्क, उद्य कॉलनी) यांची अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली आहे. अरुण बर्वे यांचा मृतदेह आज सकाळी पंचवटी पोलिसांनी रामवाडी, कोशिरे मळा परिसरांतील नदीकाठावर मिळून आला. अरुण यांच्या पाठीवर, पोटावर व डोक्यात धारधार शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून आल्यात. अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास अरुणची हत्या केली.

घटनास्थळावर सापडलेल्या मृतदेहापासून काही अंतरावर अरुणचा मोबाईल व गॉगल मिळून आला. यात त्याचा मोबाईल जळालेल्या अवस्थेत होता. दरम्यान अरुणची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याला देखील जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटी पोलीस निरीक्षक आनंद वाघ याच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

मयत अरुण बर्वे महापालिका पश्‍चिम विभागीय कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्‍चात आई, भाऊ तसेच विवाहित बहिण असून अरुणचे द्वारका परिसरांत चटकदार नावाचे हॉटेलदेखील आहे. या घटनेतील सर्व संशयित फरार असून खूनाचे कारण अस्पष्ट आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान पंचवटी परिसरांत एकामागोमाग खुनाच्या घटना होत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

*