आयुक्त मुंढेच्या कारवाईचा धडका सुरूच; कार्यकारी अभियंता हिरे निलंबित अन् पालवेंना नोटीस

0
नाशिक । संगणकीय प्रणालीत माहितीच्या आकडेवारीत तफावत आल्याच्या कारणावरुन तब्बल 2 डझन अधिकार्‍यांना कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर आज महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजेटसंदर्भातील कामांचा आढावा बैठकीत माहिती व उत्तरे न देता आल्यामुळे एका कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले व दुसर्‍या एका अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. भंडारी यांची चौकशी प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आयुक्त मुंढे यांच्याकडून महापालिका कामकाजात कर्तव्यास कसूर करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवरील कारवाई धडकपणे सुरू झाली आहे. यात मंगळवारच्या बैठकीत जवळपास सर्वच अशा 24 अधिकार्‍यांना कर्तव्यात कसुरी केल्याच्या कारणास्तव नोटिसा देण्यात आल्या.

त्यानंतर आज आयुक्तांनी बजेटमध्ये मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांच्या निविदासंदर्भातील आढावा बैठक घेतली. यात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सतीश हिरे यांना बजेटमधील कामासंदर्भात माहिती देता आली नाही. तसेच आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देता आली नाही. त्यामुळे आयुक्त मुंढे यांनी हिरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

हिरे यांच्या सोबतच असलेले उपअभियंता राजेश पालवे यांनाही देखील आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या धडक कारवाईनंतर महापालिकेतील कार्यकारी अभियत्यांसह उपअभियंत्यात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या कामकाजाला शिस्त लावताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आतापर्यंत डझनाच्यावर अधिकारी – कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले असून यात आज एकाची भर पडली. तसेच आत्तापर्यंत तीन जणांना बडतर्फ करण्यात आले आहे. तर नोटिसा देण्याचा आकडा हा महपाालिकेच्या इतिहासात विक्रम मोडणारा असा आहे. या एकूण धडाकेबाज कामगिरीमुळे मात्र अधिकारी व कर्मचारी भीतीच्या सावटाखाली काम करीत आहे.

आज आयुक्त मुंढेंनी गुरुवारी बजेटसंदर्भात बांधकाम विभागाची मॅरेथॉन बैठक घेतली. यात आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना हिरे आणि पालवे यांना उत्तरे देता आली नाही. ही बैठक संपेपर्यंत उभतांवरील कारवाई आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात आली.
तात्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्यावर मोठी कारवाई करीत त्यांना पदावनत करण्यात आले. आता नवीन सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी यांची देखील चौकशी प्रशासनाकडून प्रस्तावीत करण्यात आली आहे. त्यांच्यावर बिटको हॉस्पिटलच्या निर्मितीत हलगर्जी आणि कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे त्याच्याविरुद्ध आता आयुक्तांकडून चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून त्या प्रस्तावावर अद्याप आयुक्तांच्या सह्या बाकी असल्याचे सांगण्यात आले. डॉ. भंडारी त्यांच्यावरील दोषारोप गंभीर स्वरुपाचेच असल्याने त्यांच्यावरही कारवाई अटळ मानली जात आहे.

LEAVE A REPLY

*