नितीन आगे खून खटला प्रकरण : फितूर साक्षीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

0
पुणे (प्रतिनिधी) – महाराष्ट्राला हादरविणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा गावातील नितीन आगे खून खटल्यात 26 साक्षीदारांपैकी 14 साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपींना निर्दोष सोडण्यात आले असून संबंधित फितूर साक्षीदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांना दिले.
आगे कुटुंबीय दहशतीखाली असून त्यांना स्वसंरक्षणार्थ पिस्तूल परवाना, पोलीस संरक्षण व त्या कुटुंबाचे पूर्णतः पुनर्वसन करण्याची मागणी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी नितीन आगेचे वडील राजू आगे व नगर कॉ. बँकेचे संचालक मनेश साठे हे उपस्थित होते.
नितीन आगे खून खटल्यातील तपासात हलगर्जीपणा झाला आहे. सबळ पुरावे व 164 अंतर्गत नोंदविण्यात आलेले साक्षी जबाब न्यायालयापुढे सक्षमपणे मांडण्यात पोलीस यंत्रणा व सरकारी वकील अपयशी ठरल्याने त्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार अमर साबळे यांनी केली. सामाजिक न्याय आणि गुन्हेगारांना कठोर शासन यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाबद्दल राजू आगे यांनी समाधान व्यक्त केले.

उच्च न्यायालयात अपील करणार –
या खून खटल्याविषयी उच्च न्यायालयात अपिल करण्यात येईल. त्यासाठी क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये निष्णात असलेले वकील नितीन आगेच्या हत्येसंबंधी सक्षमपणे बाजू मांडतील. व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी कायदेशीर मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले असल्याचे खासदार साबळे यांनी सांगितले. 

 

LEAVE A REPLY

*