Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशकात ‘निसर्ग’ चे तांडव; चक्रीवादळ धडकले; पावसाने दाणाफाण

नाशकात ‘निसर्ग’ चे तांडव; चक्रीवादळ धडकले; पावसाने दाणाफाण

नाशिक । दि.३ प्रतिनिधी

पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्री वादळ बुधवारी (दि.३) नाशिक जिल्ह्यात धडकले. वादळाने दाणाफाण करत तांडव घातले. मुसळधार कोसळणारा पाऊस व ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहणार्‍या सोसाट्याच्या वार्‍याने शहरासह जिल्ह्याला धुतले. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता. चक्रीवादळामुळे घरांची पडझड, पत्रे व छप्पर उडणे, वृक्ष कोसळणे अशा घटना घडल्या. सप्तशृंगी घाटात दरड कोसळली. दिवसभर वीजेचा लपंडाव सुरु होता. जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा दिवसभर अलर्टवर होते. चक्रिवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला.

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि.३) कोकण किनारपट्टीवर धडकले. त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर जाणवला. सकाळ पासूनच आभाळ भरले होते. पावसाची रिपरिप सुरु होती.

अलिबाग, पालघर, मुंबई येथे चक्रिवादळ धडकल्यानंतर ते शहापूर,कसारा,इगतपुरी मार्गे सायंकाळी नाशिक जिल्ह्यात धडकेल असा इशारा हवामान खात्याने दिला. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर होते. जिल्हाधिकार्‍यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना दक्षता बाळगण्याचे आदेश दिले. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. चक्री वादळ जसेजसे पुढे सरकत होते तसेतसे पावसाचा जोर वाढला होता.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा पश्चिम किनारपट्टिच्या जवळ असलेल्या भागात दिवसभर पावसाचे थैमान सुरु होते. शहरासह जिल्ह्यात वृक्ष कोसळून पडणे, पोल्ट्री फर्मचे छप्पर उडणे, विजेचे खांब पडणे असे नूकसान झाले. सप्तशृंगी गडावर दरड कोसळली. ग्रामीण भागात घरांची मोठया प्रमाणात पडझड होऊन मोठया प्रमाणात नूकसान झाले. शेतातील पिकांचिही दाणाफाण झाली.

चक्रिवादळ जसे नाशिककडे सरकत होते तशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार वारे वाहत होते. सुरक्षेची खबरदारी म्हणून शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शहर अंधारात बुडाले होते. रात्री उशीरापर्यंत जोरदार पाऊस व सोबतीला सोसाटयाचा वारा सुरु होता.

‘करोना’ नव्हे तर वादळाची चर्चा

मुंबईनंतर कसार, इगतपुरी मार्गे चक्रिवादळ नाशिकमध्ये रात्री धडकेल अशी चेतावनी हवामान खात्याने दिली होती. त्यामुळे दिवसभर नाशिककरांमध्ये वादळाची जोरदार चर्चा होती. नाशिकनंतर कळवण, चांदवड, बागलाण मार्गे धुळे व नंदूरबामध्ये वादळ तडाखा देईल अशी चर्चा होती. .

जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून गुरुवारी (दि.४)देखील सर्व यंत्रणेला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहे. नागरिकांनी देखील घराबाहेर पडणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. वादळ जरी पुढे सरकले असले तरी आपत्ती व्यवस्थापन विभागाला सर्व परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या