बेलपिंपळगावात ‘निंबोडी’च्या पुनरावृत्तीची भीती

0
बेलपिंपळगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील अंगणवाडी क्र 28 ही शेवटच्या घटका मोजत आहे.
नुकतीच निंबोडी येथील शाळेची घटना घडली. बेलपिंपळगाव येथील प्रभाग क्र. 4 मधील अंगणवाडी क्र. 28 ही शेवटच्या घटका मोजत आहे. इमारती समोरील असणार्‍या पढ़वीवरील पत्रे उडून गेले आहेत. आणि जे आहेत तेही पूर्णपणे खराब झाले असून भिंतीला देखील अनेक ठिकाणी तड़े गेले आहेत. या ठिकाणी एकूण 21 मुले व 17 मुली अशी एकूण 38 बालके शिक्षणासाठी येतात. येथे मुलांना खेळण्यासाठी देखील जागा नाही. इमारत कधी पडेल हे सांगता येणार नाही अशी स्थिती आहे. विद्यार्थी शाळेत येताना जीव मुठीत धरून येतात. त्यांना येण्या जाण्यासाठी रस्तादेखील नीट नाही.
या ठिकाणी सौ. शोभा कांगुणे सेविका व अर्चना गायकवाड़ मदतनीस म्हणून काम करतात. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की अनेकवेळा सांगूनदेखील कोणी लक्ष देत नाही. येथे मुलांना उघड्यावर शिकवावे लागत आहे. मुलांना पोषण आहार देखील बाहेर देण्यात येतो. सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा उपद्रवही आहे. जो पर्यंत नवीन इमारत होत नाही तोपर्यंत मुलांना अंगणवाडीत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी केला आहे. इमारतीला मोठाले छिद्र पडले असून त्यातून साप, विंचू वर्गात येण्याची भीती आहे. इमारत बांधून द्या नाहीतर अंगणवाडी तरी बंद करा अशी मागणी होत आहे.

या ठिकाणी एकूण 38 बालके शिक्षण घेत आहेत. ते रोज येतात परंतु येथील इमारत पूर्णपणे मोड़कळीस आली आहे. पत्रे उडून गेले आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य असून त्यामुळे पालक या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवत नाही. इमारत शेवटच्या घटका मोजत आहे. नवीन बांधकामाची मागणी केलेली आहे.
– शोभा कांगुणे, सेविका, अंगणवाडी क्र 28, बेलपिंपळगाव ता. नेवासा

LEAVE A REPLY

*