निमगाव खैरी-नाऊर रस्त्यासंदर्भात हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष

0

एसटी बसअभावी प्रवाशांची दैना

नाऊर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील खड्ड्यांनी प्रसिद्ध असलेला निमगाव खैरी ते नाऊर हा रस्ता गट न.387 व ग.न.388 या शेतातून गेल्याच्या कारणास्तव शेतकरी दिनेश पुंड यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगिती घेतल्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल सुरु आहेत. आज 12 रोजी रस्त्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून निमगांव खैरी ते नाऊर या 11 कि.मी. रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे. वैजापूरकडून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात बस, ट्रक, शेतकर्‍यांचे कांदा टेम्पो, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व इतर दैनंदिन चालणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे परिसरातील नाऊर, रामपूर, जाफराबाद, नायगाव, रामपूर, सराला, गोवर्धन, सावखेड गंगा, लाडगांव, नांदूर तसेच श्रीरामपूर-वैजापूरकडे जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांची ससेहोलपट होत आहे.

या रस्त्यावरील गट नं. 387 व 388 संदर्भात अ‍ॅड. दिनेश पुंड यांनी स्थगिती घेतली असून त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त माझ्या गटातून रस्ता गेला असून त्या गटाच्या पश्चिमेकडून रस्ता गेल्याच्या बाबतीत याचिका दाखल केली आहे. इतर रस्ता करण्यासाठी माझी काहीही अडचण नाही. मात्र या न्यायालयीन प्रक्रियेमुळे वैजापूर आगाराने श्रीरामपूरला चालणार्‍या बस बंद केल्या आहेत. श्रीरामपूर आगाराने सुद्धा या रस्त्याने प्रवासी सुरक्षित नसल्या कारणाने बस बंद केल्या आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे परिसरासह श्रीरामपूर व वैजापूर या दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, हायकोर्टामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कोकणे हे या रस्त्यासंदर्भात आपल्या भागातील नागरिकांचा महत्वाचा दळणवळणाचा प्रश्न मांडणार आहेत.

LEAVE A REPLY

*