निळंवडेसाठी 2 हजार 369.90 कोटीची सुप्रमा

0
साई संस्थान व केद्रांच्या निधी प्राप्तीचा मार्ग मोकळा
पिंपरी निर्मळ (वार्ताहर)- उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडेसाठी 2 हजार 369.90 कोटी रूपयांची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता पाटबंधारे विभागाकडुन मिळाल्यामुळे लाभधारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्याचे विधान सभा विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे प्रकल्पासाठी राज्य सरकारने 2 हजार 369.90 कोटी रूपयांची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता 21 जुन 2017 अन्वये दिली आहे. त्यामुळे साई संस्थानचे 500 कोटी तसेच राज्य सरकार कडुन मिळणारे व केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेतुन निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असुन रखडलेल्या कालव्यांच्या कामाला गती मिळण्याचा आशावाद जिरायत व दुष्काळी शेतकर्‍यांमध्ये तयार झाले असुन शेतकर्‍यांमध्ये आनदांचे वातावरण आहे.
मार्च 2017 पर्यत निळवंडे प्रकल्पावर जवळपास 926.74 कोटी खर्च झालेला आहे. धरणाचे बांधकाम पुर्ण झाले असुन त्यामध्ये पाणी अडविण्यास सुरवात झालेली आहे. मात्र कालव्याअभावी लाभक्षेत्रातील जिरायती शेतकर्‍यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे शेतकर्‍यांमधुन प्रचंड संतापाचे वातावरण होते.
या प्रकल्पाला चार कालवे असुन जवळपास 182 गावातील 68 हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. शासनाने या चतुर्थ सुप्रमा देतांना काही अटी घातल्या असुन सन 2018 ते 19 पर्यंत धरण तर 2023 ते 24 पर्यंत कालवे पुर्ण करावेत, लाभ क्षेत्रात सुक्ष्म सिंचनास पुरक व्यवस्था निर्माण करावी, तसेच शासन निर्णयाप्रमाणे भुसंपादन कमी करणेसाठी प्राधान्याने नलिका वितरण प्रणालिचा अवलंब करावा, साई संस्थान कडुन मिळणार्‍या निधी प्राप्ती साठी कार्यवाही करावी.
लाभक्षेत्रात पाणी वापर संस्था स्थापन करुन सिंचन व्यवस्था त्यांच्याकडे हस्तातरीत करावी. अशा काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र सुप्रमा मिळाल्यामुळे साई संस्थानचे 500 कोटी व केंद्राच्या पंतप्रधान सिंचन योजनेचा निधी मिळणे सोपे होणार असल्यामुळे येत्या दोन वर्षातच कालवे पुर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिरायती लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

 

 

LEAVE A REPLY

*