निळवंडेची आश्‍वासने जाहली उदंड, कामेही ‘उदंड’ कालवे खोदाईसह 611 बांधकामे अपूर्ण

0

निळवंडे कालव्यांची रेंगाळलेली कामे यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता मावळली

पिंपरी निर्मळ – उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायती भागासाठी वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांची रेंगाळलेली कामे लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे. कालवे खोदाईसह कालव्यांवरील तब्बल 611 बांधकामे शिल्लक आहेत तर अवघे 29 बांधकामे प्रगतिपथावर असून 50 बांधकामे पूर्ण झाली आहेत. जलसंपदा विभागाकडे कामासाठी निधी व धरणात पाणी असूनही चालू वर्षीही शेतकर्‍यांना दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. निळवंडे धरणाची मूळ प्रशासकीय मान्यता जवळपास 50 वर्षापूर्वीची जुलै 1970 आहे.

धरणाचे प्रत्यक्ष काम धरणाची जागा बदलून जून 1993 ला सुरू झाले. 1972 पासून कालव्यांची कामे सुरू असलेल्या निळवंडे प्रकल्पासाठी आजअखेर 1005.21 कोटी खर्च झाला असून उर्वरित कामांसाठी 1364.74 कोटींची आवश्यकता आहे. यामध्ये डाव्या कालव्यासाठी 432.18 कोटी, उजव्या कालव्यासाठी 334.25 कोटी तसेच वितरिकांसाठी 453.75 कोटींची गरज आहे. चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात 158 कोटींची तर नाबार्डकडून 189 कोटींची तरतूद झालेली आहे. मात्र अकोले तालुक्यात बंदिस्त कालवे की खुले या वादात कालव्यांची कामे बंद आहेत. अकोले वगळता लाभक्षेत्रातील दोन्ही कालव्यांची मातीकामे काही प्रमाणात पूर्ण झालेली आहेत. मात्र कालव्यांवरील बांधकामे मोठ्या प्रमाणात प्रंलबित आहेत.

तालुकानिहाय खोदकामे व बांधकांमाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे आहे. अकोले तालुक्यातील डावा कालवा 2 ते 28 किमी दरम्यान खोदकाम 13% तर भराव काम अवघा दीड टक्का झाले आहे. तालुक्यातील 70 बांधकामे प्रंलबित आहेत. संगमनेर तालुक्यातील 29 ते 40 किमी दरम्यान खोदकामे व भराव काम 65% पूर्ण झाले. 41 ते 58 किमी दरम्यान खोदकामे व भराव काम 40% पूर्ण तर 59 ते 63 किमीमधील कालव्यांची कामे 82% पूर्ण झाली आहेत. 66 ते 75 किमी दरम्यान 94% कालव्यांची कामे पूर्ण असून संगमनेर तालुक्यात कालव्यांवरील 86 बांधकामे प्रंलबित आहेत. राहाता तालुक्यातील 76 ते 85 किमी दरम्यान 84% कालव्यांची कामे पूर्ण असून 20 बांधकामे प्रंलबित आहेत.

अंत्य कालवा 1 किमी ते 16 किमीसह तळेगाव शाखा कालवा 1 ते 15 किमी., कोपरगाव शाखा कालवा 1 ते 14 किमी, निम्नस्तर वितरिका निमगाव जाळी 1 ते 22 किमीचे कामही अत्यल्प प्रमाणात झालेले आहे. त्याचबरोबर कालव्यांवरील बांधकामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण असून मुख्य डावा कालवा 1 ते 85 किमी दरम्यान 14 जलसेतू, 30 लादी मोरी, 53 रस्ता पूल, 66 नलिका मोरी, सायफन 3, सुपर पॅसेज 14 अशी 233 पैकी 180 बांधकामे अपूर्ण आहेत.त्याचबरोबर मुख्य उजव्या 0 ते 97 किमी कालव्यावरील जलसेतू 17, लादीमोरी 60, रस्ता पूल 64, नलीकामोरी 86, फॉल 43, इनलेट 3, एसडब्ल्यूएफ 3, सुपर पॅसेज 14 अशी 309 पैकी 294 बांधकामे अपूर्ण आहेत.

तळेगाव शाखेची 27, कोपरगाव शाखेची 26, अंत्य कालव्यावरील 28 तर निम्न लघू वितरिकांवरील 181 कामे अपूर्ण आहेत. तसेच डाव्या कालव्यासाठी 977.66 हेक्टर जमीन आवश्यक असून पैकी 893.20 हे. संपादित असून 84.46 हे. संपादन बाकी आहे तर उजव्या कालव्यासाठी 510 हे. क्षेत्रापैकी 490 हे. संपादित असून 20 हेक्टर संपादन बाकी आहे.
एकीकडे जलसंपदा विभागाकडे 350 कोटींच्या पुढे निधी उपलब्ध आहे. मात्र कालव्यांची कामे भूसंपादन होऊनही बंद आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या शिवसेना भाजप सरकारच्या काळात कालव्यांचे काम ठप्प आहेत.कालव्यांची कामे सुरळीत सुरू झाल्यास व वेळोवेळी निधीची तरतूद झाल्यास कामे पूर्ण होण्यास किमान दोन वर्षांच्या पुढे कालावधी लागणार आहे, असे जाणकांराचे मत आहे. शेतकर्‍यांना मात्र चालू वर्षीही दुष्काळाला सामोरे जावे लागणार अशीच चिन्हे आहेत.

 

LEAVE A REPLY

*