Type to search

Featured सार्वमत

निळवंडे प्रकल्पाच्या पाण्यावर 182 दुष्काळी गावांचा हक्क

Share

तळेगाव दिघे (वार्ताहर)- निळवंडे कालव्यांचे अकोले तालुक्यातील काम अनधिकाराने बंद करणे ही बाब अन्यायकारक आहे. निळवंडे प्रकल्पाच्या पाण्यावर 182 गावांचाच हक्क आहे, असे प्रतिपादन निळवंडे कालवा कृती समितीचे माजी उपाध्यक्ष रमेश दिघे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात श्री. दिघे बोलत होते. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब दिघे होते. निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काले, माजी उपाध्यक्ष गंगाधर रहाणे, कृती समितीचे कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे, उपाध्यक्ष संजय गुंजाळ, अप्पासाहेब कोल्हे, अ‍ॅड. योगेश खालकर, संतोष तारगे, दत्तात्रय आहेर, दिलीप खालकर, गणपत दिघे, भाऊसाहेब गव्हाणे, शंकर वर्पे, सोपान थोरात, शिवाजी सुपेकर, गोकुळ दिघे, तुकाराम दिघे, सोपान भागवत, नानु भागवत, डॉ. आर. पी. दिघे, संपत दिघे, दादासाहेब दिघे, बापू दिघे, कैलास दिघे, लक्ष्मण दिघे, शिवाजी दिघे, बाबासाहेब दिघे, शाम दिघे, ज्ञानदेव गुंजाळ, बाळासाहेब दिघे, भास्कर दिघे, शिंदे सहित शेतकरी उपस्थित होते.

श्री. दिघे म्हणाले, निळवंडे कालव्यांचे अकोले तालुक्यातील काम काही राजकीय लोकांनी अनधिकाराने बंद केले असून ते चालू करण्यासाठी निळवंडे कालवा कृती समितीने त्या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे जनहित याचिकेद्वारे लक्ष वेधून घेतले होते. अकोले तालुक्यातील भूसंपादन पूर्ण झाले असून शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला गेला आहे. कालवे हे भूमिगत होऊ शकत नाहीत. त्यासाठी अतिरिक्त 1600 कोटी रुपये देण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर नकार दिला आहे.

26 मार्च रोजी न्यायालयासमोर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी उच्च न्यायालयासमोर लेखी प्रतिज्ञापत्र देऊन पोलीस बळ उपलब्ध करून दिल्यास आपण आठ दिवसांत काम सुरु करू असे आश्‍वासित केले आहे. 3 मे रोजीच्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालयाने पोलिसांसह सर्व प्रकारची मदत करून काम सुरु करावे असे आदेश दिले असूनही व त्याला आठ दिवसच नव्हे तर 21 दिवस उलटूनही न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील 182 गावांतील शेतकर्‍यांत मोठी नाराजी आहे.

ते म्हणाले, निळवंडे कालवे या दुष्काळी गावांसाठी वरदान ठरणार आहे. मात्र दुर्दैवाने हे पाणी काही लोकप्रतिनिधी लाभक्षेत्राबाहेर पळविण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून दुही पसरविण्याचे प्रयत्न सुरु आहे. हे घातक राजकारण प्रस्थापितांनी त्वरित थांबवावे. निळवंडे हे 182 गावांची भाग्यरेखा आहे, मात्र त्याला राजकीय शुक्राचार्यांनी आडकाठी आणली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले असून त्यांना आपल्या मुलींचे लग्न करता येत नाही. मुलांचे उच्च शिक्षण करता येत नाही. मुलांना विवाहासाठी मुली मिळणे अशक्य बनले आहे.

त्यामुळे सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांना या गोष्टींचे कुठलेही सोयरसुतक नाही ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळे येत्या 27 तारखेला निळवंडे कालवा कृती समितीने आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. दिघे यांनी केले. प्रसंगी नानासाहेब जवरे, रुपेंद्र काले, अप्पासाहेब कोल्हे, उत्तम जोंधळे, अ‍ॅड. योगेश खालकर, डॉ. आर. पी. दिघे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मच्छिंद्र दिघे यांनी केले. भाऊसाहेब दिघे यांनी आभार मानले.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!