Type to search

Featured सार्वमत

निळवंडे येथील शेतात आढळले बिबट्याचे तीन बछडे

Share
तळेगाव दिघे (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतातील गिन्नी गवतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने निळवंडे परिसरात बिबट्याचा संचार उघड झाला असून ग्रामस्थांमध्ये भीतिदायक वातावरण पसरले आहे. संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारात मोठ्या प्रमाणात डाळिंबबागा आहेत. या भागात पाणी व भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यांचा संचार सुरु झाला आहे. निवृत्ती नामदेव पवार यांच्या शेतात शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा जालिंदर निवृत्ती पवार गिन्नी गवत कापण्यासाठी गेला होता. गिन्नी गवत कापत असताना त्यास गवतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. याबाबत त्यांनी गावात माहिती दिली. त्यानंतर कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांनी त्वरीत वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली.

संगमनेर विभागाचे उपविभागीय वनअधिकारी मच्छिंद्र गायकर, संगमनेर भाग दोनचे वनक्षेत्रपाल बी. एल. गीते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शिवाजी डांगे, वनरक्षक संतोष पारधी व वनकामगार संपत ढेरंगे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सदर ठिकाणी त्यांनाही बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली. मात्र आई व पिल्लांची ताटातूट केल्यास मादी बिबट्या हिंसक बनायला नको, या उद्देशाने त्यांनी पिल्ले त्याठिकाणीच राहू दिले. रविवारी सकाळी पुन्हा वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी सदर ठिकाणी पाहणी केली असता पिल्ले आढळून आली नाहीत. मादी बिबट्याने रात्रीच पिल्ले दुसरीकडे हलविली होती. निळवंडे परिसरात मादी बिबट्याने काही हिंसक उपद्रव केल्यास त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावला जाईल, असे वनपाल शिवाजी डांगे यांनी बोलताना सांगितले. निळवंडे परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे उघड झाल्याने वाड्यावस्त्यांवर राहणार्‍या ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने मादी बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे यांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!