Type to search

Featured सार्वमत

निळवंडे डाव्या कालव्याचे 9 तर उजव्याचे साडेचार किमीचे काम अंशतः पूर्ण

Share

कोपरगाव (प्रतिनिधी)- उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झपाट्याने सुरू असून जलसंपदाचे कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल चौथ्या दिवशी डाव्या कालव्यांचे काम नऊ किमी तर उजवा कालव्याचे काम साडेचार किमी पूर्ण झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र तब्बल सव्वा महिन्याचा कालहरण केला. अखेर गोदावरी खोरे महामंडळाने मध्यस्थी करत 11 जून रोजी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्यास सांगितले.

जलसंपदा विभागाने बुधवार दि. 12 जून रोजी कालव्यांच्या कामास अधीक्षक अभियंता अरुण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अभियंता भारत शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी जवळपास पावणेतीन किमीचे काम करून कामाचा झपाटा दाखवून दिला होता. काल चौथ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जलसंपदा विभागाने अकरा पोकलेन, तीन डोझर, बारा डंपर, सात उपअभियंता, सतरा शाखा अभियंता, शंभर मजूर आदींच्या सहाय्याने डावा कालवा 9 किमी तर उजवा कालवा साडेचार किमी धरणापासून अंशतः करण्यात आला आहे. दरम्यान राज्य राखीव पोलीस दल व पोलीस खात्याचे जवळपास चारशे पोलीस या कामास चोख पोलीस बंदोबस्त पुरवीत आहेत.त्यामुळे लाभक्षेत्रातील 182 दुष्काळी गावांतील शेतकर्‍यांत समाधानाची लहर उमटली आहे. त्याबाबत निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यानी समाधान व्यक्त केले आहे.

अकोले तालुका हा खडतर असून जमीन उंचसखल असल्याने सदरच्या कामावर देखरेख ठेवणे ही बाब खूपच जोखमीची व धाडसाची मानली जाते. त्यातच वन्य प्राणी, कोण केव्हा भेटेल याचा काही नेम नसतो. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, मजूर यांना उभ्या बागायतातून काम करावे लागत असल्याने आपला जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!