Type to search

Featured सार्वमत

निळवंडे कॅनॉलचे काम शेतकर्‍यांनी बंद पाडले

Share

इंदोरी (वार्ताहर)- कोणतीही पूर्वसूचना न देता बागायती क्षेत्रातून शेती पिके उद्ध्वस्त करीत सुरू असलेले निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे काम आक्रमक शेतकर्‍यांनी इंदोरी फाटा (ता. अकोले) येथे बंद पाडले. मात्र शेतकर्‍यांना सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची समयसुचकता कालवे विभागाचे अभियंता भारत शिंगाडे यांनी दाखविल्याने बंद पडलेले काम काही वेळानंतर पुन्हा सुरू झाले.

बागायतील पट्टयातील निळवंडेच्या कालव्यांवरुन मोठे रणकंदन झाल्यावर अखेर तीन ते चार दिवसांपासून अकोले तालुक्यातील कालव्यांच्या कामाला सुरु झाली. मुख्यमंत्र्यांनी कालव्यांच्या कामांचे आदेश दिल्यानंतर तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी या आंदोलनातून आपले अंग काढून घेतले. त्यामुळे सैरभैर झालेले कालवेधारक स्वतःवरच संकट आल्याने हतबल झाले. त्यातच शेतकर्‍यांच्या उभ्या पिकातूनच कोणतीही पुर्वसुचना न देता मोठमोठे यंत्रे आणून उभ्या पिकांमध्ये घुसवत पिकांची नासाडी करत कालव्यांची कामे सुरु केली. या नुकसानीमुळे आक्रमक झालेल्या शेतकर्‍यांनी शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास काम सुरु असलेल्या इंदोरी फाट्यावरील घटनास्थळी जात काम बंद केले. सेवा निवृत्ती शिक्षक आबाजी धुमाळ, शिवाजी कोठवळ, भाउसाहेब धुमाळ, देवीदास धुमाळ, नामदेव नवले, खंडू वाकचौरे आदींसह शेतकर्‍यांनी नोटीसा न देता उभ्या पिकांमधून काम सुरु केल्याबद्दल निषेध व्यक्त केला.

काही वेळातच परीसरातील शेतकरी घटनास्थळी मोठ्या संख्येने दाखल होत काम बंद करण्यासाठी आक्रमक झाले. दरम्यान पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही घटनास्थळी दाखल झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. शेतकर्‍यांनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर अभियंता भारत शिंगाडे यांनी शेतकर्‍यांची बाजू समजून घेत शेतातील पिके काढुन घेण्याची विनंती केली व अपवादात्मक स्थितीत एक, दोन दिवसाचे सहकार्य करण्याचे मान्य केले. अधिग्रहीत जमिनीतील पिके काढण्यासाठी शेतकर्‍यांनी प्राधान्यक्रम द्यावा, संबंधित नुकसानीचा कृषी विभाग व महसूल विभाग पंचनामा करीत असल्याने बाधीत क्षेत्रातील शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचे ड्रिप व पाईपलाईनसहीत पिकांचे पंचनामे करण्याचे आवाहन श्री. शिंगाडे यांनी केल्यानंतर शेतकर्‍यांचा राग मावळला. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत फक्त पुढार्‍यांचीच चमकोगिरी होती. कालवेबाधित शेतकर्‍यांना यावेळी विश्‍वासात घेतले नसल्याची टिका अनेक शेतकर्‍यांनी केली.

स्वाभिमानी संघटनेचे ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, मनोज मोरे यांनी या नुकसानीबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राधाकृष्ण विखे यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कालवे बाधित शेतकरी आबाजी धुमाळ, शंकर वाळुंज, नामदेव नवले, बाळासाहेब घोडके, राहुल पुंडे, अशोक राक्षे, गणेश शिंदे, संतोष तिकांडे, खंडू वाकचौरे, सुभाष मालुंजकर, सुमेध मालुंजकर, सचिन जोशी, शिवाजी कोठवळ आदिंसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे, नायब तहसीलदार जगदिश गाडे, तलाठी सचिन मांढरे आदींनी कालवेधारक शेतकरी व अधिकारी यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

मुंबईमधील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत फक्त पुढार्‍यांचीच चमकोगिरी होती. कालवेबाधीत कोणत्याही शेतकर्‍याला समस्या मांडू दिल्या नसल्याने सरकार विरोधात राजकीय नेते विरहीत कालवे बाधितांचा अकोले तहसील कचेरीसमोर सोमवार दि. 17 जूनपासून बैठा सत्याग्रह व उपोषण सुरू करणार असल्याचे यावेळी कालवेबाधितांनी जाहीर केले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!