Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

2020 अखेर लाभक्षेत्राला निळवंडेचे पाणी – विखे पाटील

Share

अस्तगाव (वार्ताहर) – निळवंडेच्या कालव्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. डिसेंबर 2020 अखेर निळवंडेचे पाणी लाभक्षेत्राला मिळेल, याची जबाबदारी माझी आहे. 1200 कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने कालव्यांच्या खोदाईला सुरुवात झाली. विखे पाटलांना बदनाम करण्याचे काम काहींनी केले असल्याचा आरोप ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

राहाता तालुक्यातील केलवड व पिंपरी निर्मळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. निळवंडे कालव्यांचा अकोले, संगमनेरच्या घुलेवाडीला पत्ताच नव्हता. विरोध असता तर धरणाचे काम झाले असते का? आपण निळवंडे धरणग्रस्तांच्या 20 मुलांना नोकरीस घेऊन कायम केले. राज्याचे मुख्यमंत्री व आपले व्यक्तिगत संबंध असल्याने आपण पिचड यांना तयार केले.

अकोले तालुक्यातील धरणाच्या मुखापासून 27 किमी डाव्या कालव्याचे भूसंपादन झाले होते, परंतु जमीन ताब्यात नव्हती. काम होऊ देण्यास शेतकरी तयार नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पिचड यांना तयार केले. पिचडांचा विरोध संपविण्यासाठी ते आता भाजपमध्ये आले आहेत. उजव्या कालव्याचे 24 व डाव्याच्या 27 किमी अंतरातील कालव्यांची खोदाई सुरु झाली आहे.

आता कृती समिती कशाला पाहिजे? असा सवाल करुन ना. विखे पाटील म्हणाले, कालव्यांचे काम सुरु झाले. अकोलेत कामे होत आहेत, संगमनेरजवळ घुलेवाडीला बॉक्स करून बोगदा करू व पाणी आणू. आपल्याकडे अडचण नाही.
राज्यातील निळवंडेसह 14 प्रकल्प 80 टक्के पूर्ण होते. त्यांचे 20 ते 22 टक्के काम अपूर्ण असल्याने सरकारने ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले.

यात निळवंडेसाठी मागणी 1100 कोटी होती. मात्र त्याऐवजी आपण 1200 कोटी मंजूर करवून घेतले. निळवंडेच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. बांधकामे सुरु आहेत, त्यामुळे डिसेंबर 2020 अखेर या भागात पाणी येणारच व ते आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे ना. विखे यांनी सांगितले.

विखेंच्या द्वेषापोटी ही कृती समिती स्थापन केली आहे, असा लोकांचा समज आहे. विखेंना शिव्या घालण्याकरिता वरच्या लोकांच्या सुपार्‍या घ्यायच्या व या भागात बोंबा मारायच्या असे काम तुम्ही हाती घेतले असा माझा समज आहे. दुदैवाने पद्मभूषण विखे पाटील हयात नाहीत, परंतु त्यांच्यावर असलेला निळवंडे विरोधाचा कलंक आपण पुसू शकलो. याचे आपणाला समाधान आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्याचा धाडसी निर्णय घेतला. पद्मभूषण विखे पाटील मुख्यमंत्री यांच्या सोबत यासाठी तीन तीन तास बैठक घेऊन समजून घेत होते. त्यानंतर उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकल्पाचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

केलवडच्या सभेत अध्यक्षस्थानी बाबासाहेब गमे होते. यावेळी सुभाषराव गमे, पी. डी. गमे, आरपीआयचे बाळासाहेब गायकवाड, सुनील बनसोडे, शंकरराव डांगे, भगवानराव डांगे, डॉ. संभाजी डांगे, काळू रजपूत, संजय गोडगे, अ‍ॅड. नकुल वाघे, नामदेव घोरपडे, बाळासाहेब गमे, अंजाबापू जटाड, अ‍ॅड. अनिल गमे, भारत राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पी. डी. गमे, अ‍ॅड. नकुल वाघे यांची भाषणे झाली. शेवटी भास्कर घोरपडे यांनी आभार मानले.

पिंपरी निर्मळच्या सभेत अध्यक्षस्थानी जनसेवा ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष जालिंदर निर्मळ होते. सरपंच डॉ. मधुकर निर्मळ, एन. टी. निर्मळ, रिपाइंचे बाळासाहेब गायकवाड आदींची भाषणे झाली. गणेशचे संचालक जालिंदर निर्मळ, सूर्यकांत निर्मळ, सेवा संस्थेचे अध्यक्ष कैलास घोरपडे, उपाध्यक्ष अशोक जपे, उपसरपंच रमाकांत पवार, जनसेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ निर्मळ,

जनसेवा ग्रामविकासचे सचिव भाऊसाहेब घोरपडे, अशोक निर्मळ, ग्रा.पं. सदस्य डॉ. शिवनाथ घोरपडे, डॉ. विकास निर्मळ, विष्णू घोरपडे, सोपान निर्मळ, दत्तात्रय निर्मळ, नवनाथ निर्मळ, सोमनाथ घोरपडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ निर्मळ, संदीप निर्मळ, बाबासाहेब गवारे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचलन भीमराज निर्मळ यांनी केले.

काँग्रेसचे अस्तित्वच संपेल!
2009 ला ज्यावेळेस निवडून गेलो. त्यावेळेस काँग्रेसचे 80 आमदार निवडून आले. 2014 ला 40 निवडून आले. आता काँग्रेस पक्षाला एवढे उत्तम संघटक प्रदेशाध्यक्ष मिळालेय की, 40 चे 4 होण्याची वेळ आलीय. काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांसह स्व:च्या मतदारसंघात गुंतूंन पडले असल्याची टीका ना. विखे पाटील यांनी आ. थोरातांवर नाव न घेता केली.

पाणी प्रश्‍न सुटला
पिंपरी निर्मळ गावची पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास गेल्याने वाड्यावस्त्यांसह संपूर्ण गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे. राहाता तालुका टँकरमुक्त आहे तर शेजारी संगमनेरच्या तळेगाव, निमोण भागात अद्यापही टँकर सुरु आहेत. गणेश कारखाना चालविण्यास घेऊन त्यासाठी 70 कोटी खर्च केला. कारखाना बंद पडल्यामुळे शेतकरी कामगार उद्ध्वस्त झाले असते. शेतकर्‍यांच्या मालकीचा कारखाना खासगी लोकांना विकावा लागला असता. राज्य सरकारने कर्जमाफी, मराठा आरक्षण आदीसारखे महत्त्वाचे प्रश्न सोडविले आहेत. येत्या 21 तारखेला गावातून मोठे मताधिक्य द्यावे असे अवाहन ना. विखे यांनी ग्रामस्थांना केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!